इस्लामाबाद चर्चा; अमेरिकेचा इराणच्या गोठवलेल्या मालमत्तेच्या मुक्ततेस तत्त्वतः हिरवा कंदील

व्हाइट हाऊसने दावा नाकारला

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
11th April, 04:53 pm
इस्लामाबाद चर्चा; अमेरिकेचा इराणच्या गोठवलेल्या मालमत्तेच्या मुक्ततेस तत्त्वतः हिरवा कंदील

इस्लामाबाद : मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका (USA) आणि इराण (Iran) यांच्यात पाकिस्तानच्या (Pakistan) मध्यस्थीने होणाऱ्या महत्त्वाच्या चर्चांना सुरूवात होत असताना मोठी प्रगती घडली आहे. वॉशिंग्टनने इराणची कतारसह इतर बँकांमध्ये गोठवलेली मालमत्ता मुक्त करण्यास तत्त्वतः सहमती दर्शवली आहे.  चर्चेला सुरूवात करण्यासाठी इराणने घातलेल्या अटींपैकी ही एक महत्त्वाची अट मानली जात होती.

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल झाले  आहे. इराणकडून संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबफ ( Mohammad Bagher Ghalibaf)  हे प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करीत आहेत. या उच्चस्तरीय चर्चांमध्ये अमेरिकेचे जॅरेड कुशनर आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांचाही सहभाग आहे.

दरम्यान, या चर्चा थेट न होता ‘अप्रत्यक्ष’ पद्धतीने होणार असून; दोन्ही देशांची प्रतिनिधी मंडळे वेगवेगळ्या कक्षात बसतील. पाकिस्तानचे अधिकारी मध्यस्थी करीत प्रस्तावांची देवाणघेवाण करतील, अशी माहिती समोर आली आहे.

लेबनॉनमधील युद्धविराम, आर्थ‌िक निर्बंध हटवणे : इराणच्या अटी

इराणने स्पष्ट केले आहे की, चर्चेला सुरूवात करण्यापूर्वी लेबनॉनमधील (Lebanon)  युद्धविराम आणि आर्थिक निर्बंध हटवणे या अटी पूर्ण होणे आवश्यक आहे. याबाबत बोलताना गालिबाफ यांनी अमेरिकेवर अविश्वास व्यक्त करत “आमचा अनुभव नेहमीच अपयश आणि वचनभंगाचा राहिला आहे,” असे स्पष्ट केले.

ही मोठी जबाबदारी : डोनाल्ड ट्रम्प 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांनीही या चर्चांबाबत प्रतिक्रिया देताना “ही मोठी जबाबदारी आहे, परिस्थिती लवकरच स्पष्ट होईल,” असे म्हटले आहे.

चीनमुळे दबाव वाढला

दरम्यान, चीनकडून इराणला नवी हवाई संरक्षण प्रणाली पुरवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या चर्चांवर आणखी दबाव निर्माण झाला आहे. इस्रायल-लेबनॉन संघर्ष आणि त्यातील वाढती जीवितहानीही या चर्चांच्या पार्श्वभूमीवर चिंतेचा विषय ठरत आहे.

अटी पूर्ण होणार? 

एकूणच, इस्लामाबादमधील ही बैठक पश्चिम आशियातील दीर्घकालीन संघर्ष संपवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, अटी पूर्ण होतात की नाही आणि परस्पर विश्वास निर्माण होतो का, यावरच या चर्चांचे यश अवलंबून असेल.


हेही वाचा