परफ्युमने लपवला दुर्गंधीचा वास

मेरठ : बाप-लेकीचे (Daughter) नाते वेगळेच असते. मुलीच्या निधनाचा धक्का पचवणे जन्मदात्या पित्याला कठीण जाते. मेरठ येथे अशीच अंगावर काटा आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेरठ येथे वडिलांनी (Father) आपल्या मृत मुलीचा मृतदेह तब्बल पाच महिन्यांपर्यंत घरात ठेवून तिच्यासोबत वास्तव्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीसही हादरले आहेत. मुलीच्या मृत्यूमागे वडिलांचा अंधविश्वासही दिसून आला. आजारी मुलीवर वैद्यकीय उपचार करण्याऐवजी त्यांनी जादूटोण्याचा आधार घेतला.
मेरठ, उत्तरप्रदेश येथील घटनेने पोलिसांसहीत (Uttar Pradesh Police) अनेकांना धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेली मोहल्ला परिसरात उदय भानु बिस्वास हे आपल्या ३४ वर्षीय मुलगी प्रियांकासोबत राहत होते. सुमारे पाच महिन्यांपूर्वी प्रियांकाचा मृत्यू झाला होता. मात्र, वडिलांनी ही बाब कुणालाही न सांगता मृतदेह घरातच ठेवला. दुर्गंधी पसरू नये म्हणून ते घरात सतत परफ्युम आणि अगरबत्तीचा वापर करीत होते.
दरम्यान, प्रियांका अनेक दिवसांपासून दिसत नसल्याने नातेवाईकांना संशय आला. चुलत भावाने संपर्क साधला असता उदय यांनी सुरूवातीला टाळाटाळ केली आणि प्रियांका डेहराडूनमध्ये उपचारासाठी असल्याचे सांगितले. मात्र संशय वाढल्याने नातेवाईक मेरठमध्ये पोहोचले.
नातेवाईकांनी उदय यांना पकडून घरात नेले आणि चौकशी केली असता; त्यांनी अखेर सत्य कबूल केले. घराचा दरवाजा उघडताच पोलिसांसमोर धक्कादायक दृश्य उभे राहिले—बेडवर मृतदेह नसून फक्त सांगाडा शिल्लक होता. घरात कचऱ्याचे ढीग साचलेले होते, तर परफ्युमच्या अनेक रिकाम्या बाटल्या आढळल्या.
उपाचाराऐवजी घेतला जादूटोण्याचा आधार
प्राथमिक माहितीनुसार, प्रियांका संगणक शिक्षिका (Computer Teacher) होती आणि तिला कावीळ झाली होती. उपचाराऐवजी वडील जादूटोण्याचा आधार घेत असल्याचेही समोर आले आहे. मुलीच्या मृत्यूनंतर भीतीपोटी त्यांनी हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. या विचित्र आणि हृदयद्रावक घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.