श्री लईराई जत्रेत सुरक्षेसाठी कडक निर्बंध; पहिल्या दिवशी केवळ ३४ दुकाने थाटण्यास मान्यता

सीसीटीव्हीचा सर्वत्र असेल कडा पहारा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
12th April, 02:18 pm
श्री लईराई जत्रेत सुरक्षेसाठी कडक निर्बंध; पहिल्या दिवशी केवळ ३४ दुकाने थाटण्यास मान्यता

पणजी: शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या वार्षिक जत्रेच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. गेल्या वर्षीच्या दुर्घटनेचा धडा घेत, यंदा जत्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २१ एप्रिल रोजी केवळ ३४ दुकाने आणि स्टॉल्सना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांची गर्दी आणि धोंडांची सुरक्षा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी ही माहिती दिली असून, संपूर्ण जत्रा परिसरावर ३० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

गतवर्षी शिरगाव जत्रेत झालेल्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन सहा भाविकांचा मृत्यू झाला होता, तर ७० हून अधिक जण जखमी झाले होते. अशी पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने यंदा आराखड्यात मोठे बदल केले आहेत. धोंड ज्या मार्गावरून होमकुंडाकडे जातात, त्या मुख्य रस्त्याच्या कडेला यंदा एकही दुकान लावण्यास मनाई करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी मंदिराच्या मागील मैदानात १५, इतर रस्त्यांवर १० आणि तळीच्या बाजूला ९ अशी मर्यादित दुकाने असतील. २२ एप्रिलनंतर गर्दी ओसरल्यावर काही प्रमाणात दुकानांची संख्या वाढवली जाईल, मात्र तिथेही कडक निर्बंध कायम राहतील.

रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासोबतच वाहतूक आणि पार्किंगसाठी यंदा स्वतंत्र व प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अंकित यादव आणि डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दररोज जत्रा परिसरातील कामांचा आढावा घेत आहेत. सुरक्षेसाठी नेमलेल्या समितीने दुकानांची ठिकाणे अशा प्रकारे निश्चित केली आहेत की, जेणेकरून भाविकांच्या येण्या-जाण्याच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. प्रशासनाच्या या चोख नियोजनामुळे यंदाची लईराई जत्रा शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




हेही वाचा