काजूर येथे पार्टीदरम्यान रंगाचा बेरंग; संशयित श्वेत गावडेला अटक. रिमांडसाठी न्यायालयात करणार हजर

पणजी : सांगे तालुक्यातील काजूर येथे मित्रांच्या एका पार्टीदरम्यान अघटित घटना घडली, यात एका २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, काजूर येथील एका घरात पाच मित्रांचा गट पार्टीसाठी जमला होता. तिथे एक एअर रायफल आणण्यात आली होती. संशयित श्वेत गावडे याने केवळ गंमत म्हणून शस्त्र तन्वीच्या दिशेने रोखले आणि "गोळी झाडू का?" असे विचारत ट्रिगर ओढला. दुर्दैवाने रायफलमध्ये गोळी असल्याने ती थेट तन्वीच्या मानेला लागली आणि अतिरक्तस्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
सदर एअर गन ही ज्यांच्याकडे ही पार्टी सुरू होती, त्यांच्या सासऱ्यांची असल्याची माहिती समोर आली आहे. शेतातील पाखरे हुसकावण्यासाठी या शस्त्राचा वापर केला जात होता. तन्वी पाळी-कोठंबी येथील एका कंपनीत कार्यरत होती आणि सुटीनिमित्त मित्रांसोबत काजूर येथे गेली होती. मात्र, मित्रामित्रांच्यात सुरू असलेल्या बेफिकीर थट्टा-मस्करीचे रूपांतर एका भीषण दुर्घटनेत झाले. घटनेनंतर केपे पोलिसांनी तत्परता दाखवत संशयित आरोपी श्वेत गावडे याला काल ताब्यात घेतले आहे.
केपे पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या (Arms Act) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तन्वीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला व नंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार, गोळी लागल्यामुळे झालेल्या अतिरक्तस्रावामुळे तन्वीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्र जप्त केले असून, संशयित श्वेत याला लवकरच रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे शस्त्रांच्या हाताळणीबाबत आणि सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.