सांडपाण्याच्या प्रदूषणामुळे मळा तलावातील मासे मृत: महापौर

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
13th April, 04:36 pm
सांडपाण्याच्या प्रदूषणामुळे मळा तलावातील मासे मृत: महापौर

पणजीसांडपाण्याच्या प्रदूषणामुळे पणजीतील (Panjim)  मळा येथील तलावातील मासळी मेल्याचा निष्कर्ष गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Goa state pollution control board)  काढला आहे. सध्या प्रदूषण मंडळ पाण्याचे नमुने घेत असून, अहवालानंतर खरे कारण समोर येईल, असे पणजीचे महापौर रोहित मॉन्सेरात यांनी सांगितले.

स्थानिकांच्या मते यापूर्वीही मासे मरण्याच्या घटना घडल्या आहेत. नेवगी नगर मैदानातील खाऱ्या पाण्याच्या तलावात हजारो मासे मेले.  किलाप, बाण आणि चणक यांसारख्या माशांचे ढीग पाण्यावर तरंगत होते. या मृत माशांमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती.  पणजी महानगरपालिकेने नंतर तलाव स्वच्छ करून मृत माशांची विल्हेवाट लावली.

आम्ही या संदर्भात संबंधित विभागाची बैठक बोलावली होती. तलावात सोडलेल्या सांडपाण्यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मासे मेले, असे मत्स्यपालन, प्रदूषण नियंत्रण आणि जलसंपदा विभागाने सांगितले, असे मोन्सेरात म्हणाले.

 सांतीनेज खाडीकडे पाहिल्यास, बहुतेक वस्त्यांतील सांडपाणी उघड्यावर सोडले जात आहे. आणि लोक कचराही टाकत आहेत.  त्यामुळे, आम्ही एप्रिलमध्ये सर्व विभागांची बैठक बोलावली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम, पेयजल, पोलीस, मत्स्यव्यवसाय आणि नदी वाहतूक विभाग यावर तोडगा काढण्यासाठी एकत्र काम करणार असल्याचे मोन्सेरात म्हणाले.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मते, सांडपाण्याच्या अतिप्रवाहामुळे पाण्यातील ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. पण यासाठी आम्हाला एका दीर्घकालीन आणि पद्धतशीर उपायाची गरज आहे. कोणत्या घरांमध्ये अजूनही सांडपाण्याची जोडणी शिल्लक आहे? याचा या बैठकीत आम्ही पणजी आणि तळगावमधील परिस्थितीचा आढावा घेऊ. "सांडपाणी सोडणाऱ्या प्रत्येक घराचा शोध घेऊन आम्ही हा प्रश्न सोडवू," असे मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.

मासे मरण्याची ही पहिली वेळ नाही.  यापूर्वीही गरमीच्या दिवसांत मासळी मृत पावली आहे;  असे तलावाजवळ राहणारे स्थानिक रहिवासी आलेक्सीयो फर्नांडिस म्हणाले.

आम्ही इथे ५४ वर्षांपासून राहत आहोत.  मासे मरण्याची ही दुसरी किंवा तिसरी वेळ आहे. आता केवळ छोटे मासे मेले.  आठ वर्षांपूर्वी सर्वात मोठी मासळी मृत पावली होती.  काल दोन दिवसांपासून खूप दुर्गंधी येत होती. आता नगरपालिकेने सर्व मेलेले मासे हटवल्यामुळे दुर्गंधी नाही, असे फर्नांडिस म्हणाले.

तलावात पाणी शिरू नये म्हणून तलावाच्या काठावर मानस तयार करण्यात आली आहे.  पूर्वी समुद्राचे पाणी आत यायचे आणि त्याचा प्रवाह चांगला असायचा. आता तलावात पाणी आत येत नाही आणि जास्त पाणी बाहेर जाते. शिवाय, लोक येऊन तलावाच्या काठावर कचरा टाकतात. चार वर्षांनंतर आता तलावात मासे मेले आहेत, असे फर्नांडिस म्हणाले. मळ्यातील तलाव जैवविविधतेने समृद्ध असलेला खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. 



 

हेही वाचा