धोकादायक जलाशयांच्या ठिकाणी कडक निर्बंध; दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांचे आदेश जारी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
15th April, 05:17 pm
धोकादायक जलाशयांच्या ठिकाणी कडक निर्बंध; दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांचे आदेश जारी

मडगाव: दक्षिण गोव्यातील जलाशयांच्या ठिकाणी बुडून होणाऱ्या मृत्यूंच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध जारी केले आहेत. धोकादायक जलस्रोतांची ओळख पटवणे, सावधगिरीचे फलक उभारणे, देखरेख ठेवणे आणि समन्वय राखून तात्काळ मदतीसाठी इमर्जन्सी हेल्पलाईन सक्षम करण्यासंदर्भात विशेष आदेश जारी करण्यात आले आहेत.

दक्षिण गोवा जिल्ह्यातील नद्या, धबधबे, खाणी आणि समुद्रकिनाऱ्यांवर बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली असून, जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस (आयएएस) यांनी विशेष आदेश जारी केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या आदेशानुसार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सर्व संबंधित घटकांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने धोकादायक ठिकाणांची माहिती गोळा करणे आणि ज्या ठिकाणी बुडण्याचे प्रकार वारंवार घडतात, अशा संवेदनशील ठिकाणांची यादी करून त्यांचे वर्गीकरण करणे समाविष्ट आहे. सर्व धोकादायक ठिकाणी पर्यटकांना सावध करण्यासाठी 'इशारा फलक' लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.

पोलीस विभागाला धोकादायक जलाशयांच्या ठिकाणी गस्त वाढवण्याचे आणि आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईचा आणि देखरेखीचा नियमित अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा लागणार आहे. पर्यटकांच्या गर्दीच्या आणि धोकादायक ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ तैनात केले जाईल. तसेच, आणीबाणीच्या काळात त्वरित मदतीसाठी इमर्जन्सी हेल्पलाईन अधिक सक्षम करून ती इतर संबंधित यंत्रणांशी जोडली जाणार आहे.

नगरपालिका प्रशासन आणि पंचायतींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील असुरक्षित विहिरी, तलाव किंवा इतर पाणीसाठ्यांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. हा आदेश दक्षिण गोवा जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी तसेच पर्यटकांनाही लागू असेल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.


हेही वाचा