मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत : चिकोळणा-बोगमाळो येथे नवीन कॅम्पसची पायाभरणी

वास्को : शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी गोवा सरकार कटिबद्ध असून राज्यातील ६०० हून अधिक सरकारी शाळांचा कायापालट करून त्याठिकाणी आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. चिकोळणा-बोगमाळो येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजन व पालकांचा सन्मान राखावा, असे आवाहनही त्यांनी केले.
डायोसीसन सोसायटी ऑफ एज्युकेशनच्या सेंट अँड्यूज स्कूलच्या नवीन कॅम्पसची पायाभरणी चिकोळणा येथे करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. सावंत उपस्थित होते. यावेळी गोवा आणि दमण आर्च डायोसीसचे सहाय्यक बिशप सिमिआव फर्नांडिस, मंत्री मॉविन गुदिन्हो, म्हापसाचे आमदार जोशुआ डिसोझा, वास्कोचे आमदार दाजी साळकर, रेव्हरंड फादर अँथनी वाझ, प्राचार्य रसेल कुतिन्हो, पीटीए अध्यक्ष पीटर फर्नांडिस, खजिनदार अंजली मडकईकर, चिकोळणा कोमुनिदादच्या अध्यक्षा एश्टर शंखवाळकर, अॅटर्नी महेंद्र साळकर, खजिनदार उमेश शिंदे, बोगमाळोचे सरपंच संकल्प महाले, उपसरपंच लोरेना कुन्हा तसेच उद्योजक संजय सातार्डेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा स्तरावर कुशलता विकास व व्यावसायिक प्रशिक्षणावर भर दिला जात आहे. ‘विद्या समीक्षा केंद्रा’च्या माध्यमातून राज्यातील सुमारे दोन लाख विद्यार्थी व शिक्षकांना लाभ मिळाला आहे. तसेच मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत आरोग्य, योग व सुरक्षा विषयक शिक्षण देण्यात येत असून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व कौशल्य विकसित करणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी सांगितले की, या ठिकाणी भव्य शैक्षणिक संकुल उभारण्याचे स्वप्न फादर कॉस्ता व फादर ग्राबियल यांनी पाहिले होते. ते स्वप्न रेव्हरंड फादर अँथनी वाझ यांनी साकार केले आहे.
क्रीडांगणासाठी अतिरिक्त जागा देणार
चिकोळणा कोमुनिदादच्या या जागेवर पूर्वी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र, शिक्षणाला प्राधान्य देत ती जागा सेंट अँड्यूज स्कूलसाठी देण्यात आली असून कचरा प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आला आहे. या शिक्षण संस्थेला क्रीडांगणासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता असून ती लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, असे मंत्री गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.