म्हापशातील स्व. खेमानींचे घर धोकादायक जाहीर

आवश्यक सुरक्षात्मक काळजी घेण्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांचा पालिकेला आदेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th April, 09:24 pm
म्हापशातील स्व. खेमानींचे घर धोकादायक जाहीर

म्हापसा : येथील आंगड भागात असलेले दिवंगत डॉ. खेमानी यांचे घर अत्यंत जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत असून, ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. सार्वजनिक सुरक्षितता लक्षात घेऊन उपजिल्हाधिकारी वर्षा परब यांनी म्हापसा पालिका मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षकांना हे घर पाडण्याचे किंवा दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून या इमारतीभोवती बॅरिकेड्स लावण्याचे आदेश दिले आहेत.
या मोडकळीस आलेल्या घराबाबत वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची दखल घेत उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकीत यादव यांनी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार म्हापसा पालिकेने पाहणी करून दिलेल्या अहवालाच्या आधारे उपजिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.
आगामी मिलाग्रिस फेस्ताच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकाऱ्यांनी कडक पावले उचलली आहेत. या इमारतीभोवती लोकांचा वावर रोखण्यासाठी त्वरित बॅरिकेड्स लावावेत आणि फेस्तासाठी या परिसरात कोणतेही स्टॉल्स लावू नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. गरज पडल्यास इमारत रिकामी करून पाडण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याच्या सूचना पालिकेला देण्यात आल्या आहेत.
पोलिसांना गस्तीचे आदेश
संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी म्हापसा पोलीस निरीक्षकांना या भागात कडक गस्त घालण्याचे आणि अनधिकृत व्यक्तींना प्रवेश करण्यापासून रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिसरातील नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. डॉ. खेमानी दाम्पत्याच्या निधनानंतर गेली अनेक वर्षे हे घर विनावापर पडून आहे. सध्या या इमारतीचे गंजलेले पत्रे, दगडी जिना आणि भिंती अत्यंत कमकुवत झाल्या आहेत. ही वास्तू रहिवाशांसाठी भीतीचे कारण ठरली होती, ज्याची आता प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

हेही वाचा