लखनौ खंडपीठाचे निर्देश : तपास सीबीआयकडे

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
लखनौ : लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते राहुल गांधी दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून अडचणीत आले आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने या प्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
राहुल गांधी यांच्याकडे भारतासोबतच ब्रिटनचेही नागरिकत्व असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. भारतीय संविधानानुसार, कोणत्याही व्यक्तीला दुहेरी नागरिकत्व ठेवता येत नाही. एखादी व्यक्ती दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारत असेल, तर तिचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येते. अशा परिस्थितीत ती व्यक्ती भारतात निवडणूक लढवण्यास किंवा संसदेचे सदस्य होण्यास अपात्र ठरते. राहुल गांधी यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक रायबरेली मतदारसंघातून जिंकली आहे. त्यामुळे या आरोपाचे गांभीर्य वाढले आहे.
भाजप नेते विघ्नेश शिशिर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने रायबरेली पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची केलेली मागणीही न्यायालयाने मान्य केली आहे. आता सीबीआय राहुल गांधी यांच्या ब्रिटीश नागरिकत्वाशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करेल. आरोप सिद्ध झाले, तर राहुल यांची खासदारकी धोक्यात येऊ शकते.