कळंगुट खुनातील फरार आरोपींना छत्तीसगडमधून अटक

कळंगुट पोलिसांची कारवाई : ५ दिवसांची पोलीस कोठडी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
18th April, 12:56 pm
कळंगुट खुनातील फरार आरोपींना छत्तीसगडमधून अटक

म्हापसा : गोव्यातील (Goa) कळंगुट (Calangute) येथील तिवायवाडा येथे झालेल्या राजभर रविनारायण (२७) या युवकाच्या खून प्रकरणातील फरार आरोपी आदित्य शशिकांत प्रसाद व भावेश भोजाराम साहू यांना पोलिसांनी छत्तीसगडमधून अटक केली आहे. म्हापसा न्यायालयाने या दोन्ही संशयितांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित कोमल बरसकर याला घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली होती.

दरम्यान, या घटनेनंतर आदित्य आणि भावेश हे दोघे रेल्वेमार्गे छत्तीसगडला पळून गेले होते. तांत्रिक माहितीच्या आधारे कळंगुट पोलिसांनी (Goa Police)  छत्तीसगड पोलिसांच्या मदतीने त्यांना १४ एप्रिल रोजी ताब्यात घेतले आणि ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणले. या गटातील इतर १५ जणांवर यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

नेमकी घटना काय?

आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीसाठी (IPL Cricket betting)  गोव्यात आलेल्या १९ जणांच्या गटातील चौघे जण एका गेस्ट हाऊसमध्ये मद्यपान करत बसले होते. यावेळी मयत राजभर याने मुख्य संशयित कोमल याच्या प्रेयसीबद्दल अश्लील टिप्पणी केल्याने वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात कोमलने सुरीने राजभरवर हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी धावणाऱ्या राजभरला स्विमिंग पूलजवळ गाठून संशयितांनी त्याच्यावर वार केले, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा