गौतम खट्टरचे फ्रांसिस झेवियरविषयीचे वक्तव्य हा भाजपचा जातीय ध्रुवीकरणाचा डाव : कॉंग्रेस

कार्यक्रमाला हजर असलेल्या पोलिसांविरुद्ध कारवाईची मागणी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
गौतम खट्टरचे फ्रांसिस झेवियरविषयीचे वक्तव्य हा भाजपचा जातीय ध्रुवीकरणाचा डाव : कॉंग्रेस

पणजी : वास्को येथे एका कार्यक्रमात गौतम खट्ट्र यांनी सेंट फ्रांसिस झेवियर यांचा उल्लेख आतंकवादी असा करणे हा भाजपचा गोव्यात जातीय ध्रुवीकरण करण्याचा डाव आहे, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे. वास्को येथे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पोल‌िसांवर गुन्हा नोंद करून कारवाई करण्याची मागणी कॉंग्रेसने केली आहे. 

कॉंग्रेस पक्षाने आज पणजी (Panjim)  येथे पत्रकार परिषद घेतली. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अमीत पाटकर, आमदार कार्लुस फेरेरा, दक्षिण गोव्याचे (South Goa)  खासदार विरियातो फर्नांडिस, महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतीक्षा खलप पत्रकार परिषदेला उपस्थित होते. 

वास्को (Vasco)  येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात मंत्री मॉविन गुदिन्हो, आमदार संकल्प आमोणकर, आमदार दाजी साळकर उपस्थित होते. गौतम खट्टर यांच्या तोंडून जेव्हा सेंट फ्रांसिस झेवियर आतंकवादी असल्याचे शब्द आले तेव्हा भाजप मंत्री तसेच आमदारांनी त्यांना लगेच रोखून भाषण बंद करायला का लावले नाही.

राज्यात जातीय ध्रुवीकरण तयार करून जातीय तेढ निर्माण करण्याचा भाजपचा हा डाव आहे; असा आरोप प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अमीत पाटकर यांनी केला. गौतम खट्टर यांच्यासहीत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पोलिसांविरुद्ध (Police)  गुन्हा नोंद करून कारवाई करण्याची मागणी आमदार कार्लुस फेरेरा यांनी केली.  

भाजप सरकार महिलाच नाही तर एसटी बांधवांविरोधात असल्याचा आरोप दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केला.  महिला आरक्षण विधेयक २०२३ वर्षी संमत झाले होते. कॉंग्रेस पक्षाने त्याला पाठिंबा दिला होता. २०२४च्या निवडणुकीत महिला आरक्षणाची कार्यवाही का केली नाही? कॉंग्रेस नाही तर भाजप महिला विरोधी आहे, असा आरोप खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केला.

गोव्याचे (Goa) एसटी आरक्षण विधेयक संमत होऊन सुद्धा एसटी आरक्षणाची कार्यवाही करण्याचा प्रयत्न सरकार का करत नाही. १३१ वे  घटना दुरुस्ती विधेयक हे महिला आरक्षणासाठी नव्हते तर ते लोकसभेचे मतदारसंघ वाढवण्यासाठी होते. त्यासाठी कॉंग्रेसने विरोध केला, असे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.   

हेही वाचा