लईराई जत्रेनिमित्त शिरगाव, मुळगावसह पाच गावांतील मद्यविक्रीची दुकाने राहणार बंद

शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
3 hours ago
लईराई जत्रेनिमित्त शिरगाव, मुळगावसह पाच गावांतील मद्यविक्रीची दुकाने राहणार बंद

पणजी:  शिरगाव येथील श्री देवी लईराईची प्रसिद्ध जत्रा उद्या २१ एप्रिलपासून मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या जत्रेच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच शांतता अबाधित ठेवण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव (IAS) यांनी विशेष आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, शिरगाव आणि परिसरातील पाच प्रमुख गावांमधील सर्व मद्यविक्रीची दुकाने ठराविक कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत हा निर्णय घेतला असून, तो शिरगावसह मुळगाव, मये, खोर्जूवे आणि अस्नोडा या भागांना लागू असेल. हे निर्बंध २० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून लागू झाले असून, २२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व मद्यविक्रीची दुकाने पूर्णपणे बंद राहतील. मद्यविक्रीच्या परवानाधारक अस्थापनांनाही हा आदेश बंधनकारक करण्यात आला आहे. अबकारी आयुक्तांच्या शिफारसीनुसार, जत्रेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि भाविकांना सुरक्षित वातावरणात दर्शन घेता यावे, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ नुसार कडक दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल. जत्रेसाठी येणाऱ्या हजारो भाविकांची सुरक्षा आणि सार्वजनिक शांतता ही प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे. स्थानिक पोलीस आणि अबकारी विभागाला या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, ठिकठिकाणी देखरेख ठेवली जाणार आहे. भाविकांनी आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हेही वाचा