बंगालमध्ये मासळी निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी; तृणमूल-भाजप आमनेसामने

पंतप्रधान नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी यांचाही जोरदार प्रचार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
बंगालमध्ये मासळी निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी; तृणमूल-भाजप आमनेसामने

कोलकाता : बंगालच्या राजकारणात सध्या एक वेगळाच मुद्दा गाजताना दिसत आहे—मासळी! बंगाली खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली मासळी आता निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी आली आहे. तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात यावरून जोरदार राजकीय चकमक रंगली आहे.

तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress)  ‘भाजप (BJP) सत्तेत आली तर कालीमातेला मासळीचा नैवेद्य देता येणार नाही’ असा संदेश देणारी पोस्टर्स लावत भाजपवर सांस्कृतिक हल्ला चढवला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने ‘दिवस-रात्र मासे खा, पण मत भाजपलाच द्या’ अशा घोषणांनी प्रचाराला धार दिली आहे. यामुळे मासळी हा विषय थेट जनतेच्या भावनांशी जोडला गेला आहे.

या वादात पंतप्रधान (Prime Minister)  नरेंद्र मोदी (Narendra Modi)  आणि पश्चिम बंगालच्या (West Bengal)  मुख्यमंत्री (Chief Minister) ममता बॅनर्जी यांनीही उडी घेत एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे. हल्दिया येथील सभेत मोदी यांनी पश्चिम बंगाल मत्स्य उत्पादनात स्वावलंबी नसल्याची टीका केली, तर ममता बॅनर्जी यांनी “आम्ही उत्पादित करतो तेच मासे खातो” असे ठाम प्रत्युत्तर दिले.

भाजप नेते अमित शहा यांनीही मासे किंवा अंडी खाण्यावर कोणतीही बंदी आणली जाणार नसल्याचे स्पष्ट करत तृणमूलवर अफवा पसरवल्याचा आरोप केला. मात्र, बिहारमधील काही निर्बंधांचा दाखला देत तृणमूलने हा मुद्दा अधिक तीव्र केला आहे.

दरम्यान, निवडणूक प्रचारात उमेदवारही मागे नाहीत. बंगाली नववर्षानिमित्त अनेक उमेदवार मासळी हातात घेऊन प्रचार करताना दिसले. बिधाननगरमध्ये भाजपचे उमेदवार शरद्वत मुखर्जी यांनी “खाद्यसंस्कृतीवर कोणतेही निर्बंध येणार नाहीत” असे सांगत मतदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, खाद्यसंस्कृती, ओळख आणि भावनांवर आधारित हा प्रचार दोन्ही पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरला जात आहे. “आम्हीच बंगाल आणि बंगाली संस्कृतीचे खरे रक्षणकर्ते आहोत” हे दाखवण्याची स्पर्धा या निमित्ताने अधिक तीव्र झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा