बारबाला ते ‘ड्रग्ज क्वीन’पर्यंतचा प्रवास

मुंबई : टिटवाळा परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Squad) मोठी कारवाई करत तब्बल ६ कोटी रुपयांच्या एक्स्टसी गोळ्यांसह कथित ‘ड्रग्ज क्वीन’ (Drugs Queen) अश्विनी पॉल हिला अटक केली आहे. या कारवाईमुळे मुंबई (Mumbai) व आसपासच्या भागात सक्रिय असलेल्या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड झाला असून; तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे.
पोलिसांच्या (Maharashtra Police) माहितीनुसार, रंगीबेरंगी एक्स्टसी गोळ्यांच्या माध्यमातून तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या या रॅकेटची सूत्रधार अश्विनी पॉल असल्याचा संशय आहे. नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर तिच्यावर गुप्त पाळत ठेवण्यात आली आणि योग्य वेळी छापा टाकून तिला अटक करण्यात आली.
चौकशीत पुढे आले अश्विनीचे नाव
या प्रकरणात यापूर्वी साकीनाका परिसरातून इरफान अन्सारी याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून सुमारे २०० एक्स्टसी गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुफियान नावाच्या आरोपीला पकडण्यात आले. या दोघांच्या चौकशीतून अश्विनी पॉलचे नाव पुढे आले असून; सुफियान हा अश्विनी आणि इरफान यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे.
बारबाला ते ‘ड्रग्ज क्वीन’पर्यंतचा प्रवास
अश्विनी पॉल ही मूळची पुण्याची रहिवासी असून तिने सुरूवातीला मुंबईत बारबाला म्हणून काम केले. डान्स बारमध्येच तिची ओळख ड्रग्ज तस्करांशी झाली आणि त्यानंतर ती हळूहळू या अवैध व्यवसायात सक्रिय झाली. पोलिसांना चकवा देण्यासाठी ती दर दोन-तीन महिन्यांनी आपले ठिकाण बदलत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
पोलिसांचा घरावर छापा
अश्विनी टिटवाळ्यात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने तिच्यावर तीन दिवस पाळत ठेवली. हालचालींची खातरजमा झाल्यानंतर शनिवारी रात्री तिच्या घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला.
मुंबई परिसरातील पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवठा
छाप्यात ४ ते ५ मोबाईल फोन आणि ७ ते ८ सिमकार्ड जप्त करण्यात आले. अश्विनी वुईप कॉलच्या माध्यमातून ड्रग्ज नेटवर्कशी संपर्क साधत असल्याचे समोर आले आहे. मुंबई आणि परिसरातील पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवठा करण्याचे काम ती करत होती.
‘मर्सिडीज’ कोडवर्डचे गूढ
नेस्को प्रकरणातील आरोपी विनीत गेरेलानी याच्याकडून जप्त केलेल्या एक्स्टसी गोळ्यांवर ‘मर्सिडीज’ असे कोडवर्ड आढळले होते. अशाच प्रकारचे कोडवर्ड अश्विनी पॉलकडून जप्त करण्यात आलेल्या गोळ्यांवरही सापडल्याने या दोघांमधील संबंधांचा तपास सुरू आहे.
परदेशी कनेक्शनचा तपास
या संपूर्ण ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे परदेशापर्यंत पोहोचले आहेत का, याचाही तपास सुरू असून अश्विनी पॉल ही केवळ एक कडी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणातून आणखी मोठे मास्टरमाइंड उघडकीस येण्याची शक्यता असून; तपास यंत्रणा सतर्क झाली आहे.