जमिनीचे मालक म्हणतात- सरकारी नोकरीही नाही :

पेडणे : चांदेल पाणी प्रकल्पासाठी (Chandel water project) ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्या जमिनी जाऊन २५ वर्षांचा कार्यकाळ लोटला. तरीही आजपर्यंत कसल्याच प्रकारचा मोबदला किंवा कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरीही मिळालेली नाही.
निदान आता तरी आम्हाला न्याय द्यावा; अशी मागणी चांदेल पाणी प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या नागरिकांनी जलपेयमंत्री (Minister) सुभाष फळदेसाई यांची भेट घेऊन केली. यावर मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आठ दिवसांनंतर सरकारकडे संयुक्त बैठक घेऊन जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रश्न सोडवला जाईल अशी ग्वाही दिली.
मंत्री सुभाष फळदेसाई हे चांदेल अतिरिक्त पाणी प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला आले होते. त्यावेळी जमीनदारांनी आपले म्हणणे त्यांच्याकडे मांडले.
जमिनीचे मालक बाबुराव गाड यांनी सांगितले की, २५ वर्षांपूर्वी ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. त्यांना अजून पर्यंत कसल्याच प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. मंत्री, मुख्यमंत्री, सरकारची भेट घेऊन चर्चा केली. केवळ आश्वासना पलीकडे आम्हाला काहीच मिळालेले नाही. निदान आता तरी आम्हाला मोबदला आणि कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरी द्यावी; अशी मागणी केली.
बाबुराव गाड पुढे म्हणाले की, मागच्या वेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून निलेश काब्राल आले होते. त्यावेळी त्यांच्यासमोर आम्ही आमचे म्हणणे मांडले होते. त्यांनीही त्यावेळी आठ दिवसांनंतर तुमचा प्रश्न सोडवला जाईल, अशी ग्वाही दिली होती, अशी माहिती गाड यांनी दिली.
जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रश्न सोडवू : मंत्री फळदेसाई
मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की, आपण आठ दिवसांनंतर या ठिकाणी किंवा सरकारकडे संयुक्त बैठक घेऊन यावर योग्य तो तोडगा काढणार. ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. त्यांनी मोठा त्याग केल्यामुळे हा प्रकल्प उभा राहिला. आणि पेडणेवासीयांना पाणी उपलब्ध होत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जाईल; अशी ग्वाही यावेळी मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.