२७ एप्रिल रोजी देशव्यापी स्वाक्षरी मोहीम

पणजी : गोवंश हत्याबंदी कायदा संपूर्ण देशभर लागू करावा, या मागणीसाठी २७ एप्रिल रोजी विशेष स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत राज्यातील प्रत्येक तालुक्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल. तसेच मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनाही निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती हनुमंत परब यांनी दिली. बुधवारी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कुलदीप गोपाल, गजेंद्र राजपुरोहित व इतर मान्यवर उपस्थित होते.
परब यांनी सांगितले की, २७ एप्रिल रोजी गोव्यासह संपूर्ण देशभर ही मोहीम राबवली जाईल. विविध गोप्रेमी संघटनांनी एकत्र येत या मोहिमेचे नियोजन केले असून, यामध्ये कोणताही राजकीय पक्ष किंवा संस्था सामील नाही. हे आंदोलन नसून केवळ एक स्वाक्षरी मोहीम आहे. देशभरातील गोवंश सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर कायदा आणणे आवश्यक आहे. याशिवाय, गाईला 'राष्ट्रमाता' किंवा राष्ट्रीय दर्जा द्यावा, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात येणार आहे.
ते पुढे म्हणाले की, गाईची सेवा करण्याबाबतही कायदेशीर तरतुदी केल्या पाहिजेत. गोसेवेसाठी विशेष मंत्रालय तयार करणे, गो-संवर्धन महामंडळाची स्थापना करणे आणि गाईंसाठी चारा उपलब्ध होईल याची खात्री करणे, अशा प्रमुख मागण्यांचा यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यात देशभरातून ११ कोटी स्वाक्षऱ्या जमा करण्याचे आमचे ध्येय आहे. त्यानंतर २७ जुलै, २७ ऑक्टोबर आणि २७ फेब्रुवारी २०२७ पर्यंत ही मोहीम टप्प्याटप्प्याने सुरू राहणार आहे. गोहत्या बंदीसाठी आम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्नशील असून, गोव्यातील गोप्रेमी जनतेने या मोहिमेला उत्स्फूर्त पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.