
तेहरान : होर्मुझ सामुद्रधुनीत आज इराणकडून एका कंटेनर जहाजावर गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे जहाजाचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यामुळे सुरू असलेल्या तणावात आणखी भर पडली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविराम, संभाव्य शांतता चर्चांना मोठा धक्का बसला आहे.
इराणच्या पॅरामिलिटरी रिव्होल्युशनरी गार्डकडून हा सकाळी हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे (U.S.) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबतचा युद्धविराम अनिश्चित काळासाठी वाढवण्याची घोषणा केली होती. हा युद्धविराम आज संपणार होता; मात्र, इराणने चर्चेसाठी एकसंध प्रस्ताव मांडावा यासाठी अधिक वेळ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये अमेरिका-इराण यांच्यात शांतता चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, इराणने (Iran) ट्रम्प यांच्या युद्धविराम वाढवण्याच्या घोषणेची अद्याप कोणतीही अधिकृत दखल घेतलेली नाही. होर्मुझ सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) या ताज्या हल्ल्यामुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.