गोव्यात पावसासह उष्णतेचा इशारा; 'यलो अलर्ट' जारी

उष्माघातापासून वाचण्यासाठी सतत पाणी पिण्याचा आणि सुती कपडे वापरण्याचा सल्ला.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
गोव्यात पावसासह उष्णतेचा इशारा; 'यलो अलर्ट' जारी

पणजी : विविध वातावरणीय बदलांमुळे राज्यात २२ ते २५ एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेषतः २३ आणि २४ एप्रिल रोजी पावसासह उष्णतेचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे, तर २५ एप्रिल रोजी केवळ उष्णतेचा इशारा कायम असेल. बुधवारी राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

बुधवारी पणजी येथे कमाल ३४.२ अंश तर किमान २६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमध्ये कमाल ३३.६ अंश व किमान २५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. पुढील सहा दिवस किमान तापमान २५ ते २६ अंशांच्या दरम्यान राहील, तर २६ ते २८ एप्रिल दरम्यान हवामान पुन्हा कोरडे होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यांतील अवकाळी पावसाचे प्रमाण कमी आहे.

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उष्माघातापासून बचावासाठी दुपारच्या वेळी उन्हात बाहेर पडणे टाळावे, सुती कपडे वापरावेत आणि डोक्याचे संरक्षण करावे. तसेच घराची दारे-खिडक्या उघड्या ठेवून हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. सतत पाणी पिणे, मद्यपान टाळणे अशा सूचना देण्यात आल्या असून, नवजात बालके, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहनही खात्याने केले आहे.


हेही वाचा