संशयिताला अटक

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील एका उच्चभ्रू वस्तीत संतापजनक घटना घडली आहे. एका वरिष्ठ आयआरएस (IRS) अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी राहुल मीना याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कैलास हिल्स या उच्चभ्रू परिसरात राहणाऱ्या या सनदी अधिकाऱ्याने आठ महिन्यांपूर्वी राहुल मीनाला घरकामासाठी ठेवले होते. मात्र, तो आजूबाजूच्या लोकांकडून उसने पैसे घ्यायचा आणि परत करायचा नाही. या तक्रारींमुळे महिनाभरापूर्वीच त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. या रागातून आणि लुटीच्या उद्देशाने त्याने पूर्ण तयारीनिशी हे कृत्य केले. घटनेच्या दिवशी, पीडितेचे आई-वडील नेहमीप्रमाणे सकाळी जिममध्ये गेले होते. राहुलला कुटुंबाच्या दिनचर्येची पूर्ण कल्पना होती. तसेच घराची 'की-कार्ड' कोठे ठेवले जाते, याचीही त्याला माहिती होती. घराच्या अंतर्गत रचनेची आणि सुरक्षा यंत्रणेची पूर्ण माहिती असल्याने संशयिताने चार पदरी सुरक्षा व्यवस्था ओलांडून सकाळी ६:३० च्या सुमारास घरात प्रवेश केला. पीडित तरुणी, जी एक हुशार इंजिनिअरिंग पदवीधर आणि युपीएससीची तयारी करत होती, ती टेरेसवरील अभ्यासिकेत एकटीच अभ्यास करत होती.
संशयिताने छतावर जाऊन पीडितेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केल्यावर त्याने घरातील लॅम्प आणि जड वस्तूने तिच्या डोक्यावर वार केले, ज्यामुळे ती बेशुद्ध पडली. यानंतर संशयिताने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. इतक्यावरच न थांबता, घरातील बायोमेट्रिक लॉकर उघडण्यासाठी त्याने बेशुद्ध अवस्थेतील तरुणीला फरफटत खाली आणले. तिच्या रक्ताळलेल्या हाताचा अंगठा लावून त्याने तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु तांत्रिक कारणास्तव तो अयशस्वी ठरला. अखेर त्याने स्क्रू ड्रायव्हरने लॉकर तोडून रोख रक्कम आणि दागिने लुटले. सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे की, गुन्हा केल्यानंतर संशयिताने त्याचे रक्ताने माखलेले कपडे आणि बूट बदलले. त्याने पीडितेच्या भावाचे कपडे आणि चप्पल चोरून घेऊन पळ काढली. अवघ्या ५० मिनिटांत त्याने हा अंगावर शहारे आणणारा गुन्हा उरकला.
पोलिस तपासात राहुल मीनाबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून, त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा उलगडा झाला आहे. दिल्लीतील हत्याकांडापूर्वी त्याने राजस्थानमधील अलवर येथे आपल्या एका मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला होता, ज्याप्रकरणी तिथे आधीच गुन्हा दाखल आहे. राहुलला ऑनलाईन गेमिंगचे भीषण व्यसन जडले होते आणि या व्यसनापायी लागणाऱ्या पैशांची पूर्तता करण्यासाठी तो चोरी व लुटीच्या मार्गाकडे वळाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या गुन्ह्यासाठी दिल्लीत येतानाही त्याने आपल्याकडील मोबाईल १० हजार रुपयांना विकला आणि त्यातून ६ हजार रुपये देऊन अलवरहून दिल्लीसाठी गाडी भाड्याने घेतली; मात्र दिल्लीत पोहोचताच टॅक्सी चालकाला पैसे न देताच तो तिथून पसार झाला होता.
संयुक्त पोलिस आयुक्त विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितावर बलात्कार, हत्या आणि चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संशयिताने रागातून किंवा गुन्हेगारी मानसिकतेतून हे कृत्य केल्याचे स्पष्ट होत असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.