गौतम खट्टरच्या अटकेसाठी वास्कोत जनक्षोभ; आयोजकांवरही कारवाई करण्याची मागणी

शेकडो नागरिकांचा पोलीस स्थानकावर धडक मोर्चा; तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
47 mins ago
गौतम खट्टरच्या अटकेसाठी वास्कोत जनक्षोभ; आयोजकांवरही कारवाई करण्याची मागणी

पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गौतम खट्टर याच्याविरोधात गोव्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित गौतम खट्टर तसेच कार्यक्रमाच्या आयोजकांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी गुरुवारी शेकडो नागरिकांनी वास्को पोलीस स्थानकावर धडक मोर्चा काढला. यावेळी संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जोरदार घोषणाबाजी केली.



मिळालेल्या माहितीनुसार, टिळक मैदानावर एकत्र जमलेल्या शेकडो नागरिकांनी पदयात्रा काढत वास्को पोलीस स्थानक गाठले. आंदोलकांचा असा दावा आहे की, पोलिसांनी मुख्य आरोपी गौतम खट्टरला सोडून केवळ त्याचा भाऊ माधव खट्टर याला अटक केली आहे, ही केवळ 'धूळफेक' आहे. जोपर्यंत मुख्य आरोपी आणि या कार्यक्रमाचे आयोजन केले, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला.




यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक (SP) गुरुदास कदम यांनी आंदोलकांशी संवाद साधला. या प्रकरणाचा तपास आता अधिक सखोल करण्यासाठी तो राज्य गुन्हे शाखेकडे (Crime Branch) वर्ग करण्यात आला आहे. वास्को पोलीस आता केवळ या तपासात गुन्हे शाखेला सहकार्य करत आहेत, असे स्पष्टीकरण अधीक्षक कदम यांनी दिले. गुन्हे शाखेचे पथक उत्तराखंडमध्ये आधीच तैनात असून लवकरच आरोपीला तो दिसेल तिथून जेरबंद केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.




दरम्यान, वास्को पोलिसांनी मुख्य संशयित गौतम खट्टर याचा भाऊ माधव खट्टर याला हरिद्वार, उत्तराखंड येथून अटक केली आहे. बुधवारी रात्री उशिरा विमानाने त्याला मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे की, समाजात तेढ निर्माण करणारे ते वादग्रस्त भाषण माधवनेच लिहून दिले होते. गौतम खट्टरच्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन, प्रवासाची व्यवस्था आणि मानधनाचे व्यवहार माधवच सांभाळत होता. इतकेच नव्हे तर, हे भाषण स्वतःच्या मोबाईलवर रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यातही त्याचाच मुख्य सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.




सध्या माधव खट्टर वास्को पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून गौतम खट्टरपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. आंदोलकांनी स्पष्ट केले की, गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या प्रवृत्तींना पाठीशी घालणाऱ्या आयोजकांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या मोर्चामुळे वास्को शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता तपास गुन्हे शाखेकडे गेल्याने आरोपींच्या मुसक्या कधी आवळल्या जातात, याकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा