
पणजी : तामिळनाडू (Tamil Nadu), कर्नाटक (Karnataka) दरम्यान तयार झालेले टर्फ व अन्य वातावरणातील बदलामुळे गोव्यात (Goa) २४ ते २६ एप्रिल दरम्यान पावसाचा ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. तसेच या तीन दिवसांसाठी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ देखील देण्यात आला आहे. शुक्रवारी राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने; उकाडा कायम होता. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
चोवीस तासात पणजीत कमाल ३५.३ अंश तर किमान तापमान २६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमध्ये कमाल ३५ अंश व किमान २६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
पुढील सहा दिवस राज्यातील किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. २७ ते ३० एप्रिल दरम्यान राज्यातील वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. चोवीस तासात राज्यात ०.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
राज्यात १ मार्च ते २४ एप्रिल दरम्यान सरासरी २.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अवकाळी पावसाचे प्रमाण कमी आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
उष्माघातापासून वाचण्यासाठी सुती कपडे वापरणे, उन्हापासून डोक्याचे संरक्षण करणे, घराची दारे, खिडक्या उघडे ठेऊन हवा खेळती राहील याची काळजी घेणे, सतत पाणी पित राहणे अशा सूचना खात्याने केल्या आहेत.