बाणावलीत ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तिघांना अटक व सुटका

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
बाणावलीत ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तिघांना अटक व सुटका

मडगाव: बाणावली येथील वासवाडो भागातील एका इमारतीमध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर कोलवा पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तीन व्यक्तींना रंगेहात पकडले असून, सुमारे २.६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाणावलीतील 'ऐरा सलून अँड स्पा'च्या वरील इमारतीतील फ्लॅट क्रमांक दोनमध्ये बेकायदेशीर ऑनलाईन जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, २४ एप्रिल रोजी रात्री १०.३० ते २५ एप्रिल रोजी पहाटे १.२० वाजेच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत ऑनलाईन जुगार खेळणारे संशयित सनी तेलंग (३०, मूळ रा. अहमदाबाद, गुजरात), राहुल पटेल (३३, मूळ रा. अहमदाबाद, गुजरात) व तेजसकुमार दबगर (३६, मूळ रा. मेहसाणा, गुजरात) यांना अटक करण्यात आली. हे तिन्ही संशयित सध्या बाणावली येथील त्याच सदनिकेत वास्तव्यास होते.

छाप्यादरम्यान कोलवा पोलिसांनी २ लॅपटॉप, ५ मोबाईल फोन आणि ऑनलाईन जुगारासाठी वापरले जाणारे इतर तांत्रिक साहित्य जप्त केले आहे. या सर्व साहित्याची एकूण किंमत २ लाख ६० हजार रुपये इतकी आहे.

कोलवा पोलिसांनी याप्रकरणी 'गोवा, दमन आणि दीव सार्वजनिक जुगार प्रतिबंधक कायद्या'च्या (GDDPC Act) कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भगत, मंजू वांतामुरी, हवालदार रोहन नाईक आणि पोलीस कॉन्स्टेबल निखिल नाईक यांच्या पथकाने केली.

सध्या दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक संतोष देसाई, मडगाव पोलीस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर आणि कोलवा पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, सर्व संशयितांना अटक केल्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

हेही वाचा