मांडवीतील कॅसिनोंमध्ये लहान मुलांना प्रवेश का ? 'पणजेकार अगेन्स्ट कॅसिनो'चा सवाल

पणजी पोलिसांत दाखल केली तक्रार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
43 mins ago
मांडवीतील कॅसिनोंमध्ये लहान मुलांना प्रवेश का ? 'पणजेकार अगेन्स्ट कॅसिनो'चा सवाल

पणजी: मांडवी नदीतील कॅसिनो जहाजांवर 'किड्स झोन'च्या नावाखाली लहान मुलांना प्रवेश दिला जात असून, हे गोवा बाल हक्क कायद्याचे सर्रास उल्लंघन आहे, असा आरोप 'पणजेकार अगेन्स्ट कॅसिनो' (पीएसी) या संघटनेने केला आहे. या बेकायदा प्रकाराविरोधात वाल्मिकी नाईक, सबिना मार्टिन्स आणि क्रिसेल डायस यांनी शनिवारी पणजी पोलीस स्थानकात रीतसर तक्रार दाखल केली.

यावेळी माहिती देताना क्रिसेल डायस म्हणाल्या की, कायद्यानुसार २१ वर्षांखालील कोणत्याही व्यक्तीला कॅसिनो परिसरात प्रवेश देण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही अनेक कॅसिनो जहाजांवर लहान मुलांसाठी मुद्दाम 'प्ले-झोन' तयार करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे, तर तिथे मुलांच्या पार्ट्यांचे आयोजन केले जात असून, याच्या जाहिराती समाजमाध्यमांवर उजळमाथ्याने केल्या जात आहेत. कॅसिनोंनी स्वतःच अशा पार्ट्यांचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड केले आहेत. तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण जहाज हे 'कॅसिनो परिसर' म्हणूनच ओळखले जाते, त्यामुळे तिथे मुलांसाठी वेगळा विभाग करणे हे पूर्णतः बेकायदेशीर आहे.

सामाजिक कार्यकर्त्या सबिना मार्टिन्स यांनी सांगितले की, गोवा बाल हक्क कायदा कलम ८ नुसार, लहान मुलांना जुगारासाठी (गॅम्बलिंग) कोणत्याही प्रकारे प्रेरित करणे हा गंभीर गुन्हा आहे. असे असतानाही कॅसिनो व्यवस्थापन ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने मुलांच्या कार्यक्रमांची जाहिरातबाजी करत आहे. शैक्षणिक संस्थांच्या परिसरातही या संदर्भातील होर्डिंग्ज झळकत आहेत. याप्रकरणी आम्ही पणजी पोलिसांना 'एफआयआर' दाखल करण्याची मागणी केली आहे. खरे तर गेमिंग आयुक्तांनी यावर वेळीच कारवाई करणे अपेक्षित होते, मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतीही पावले उचलली गेली नाहीत.

वाल्मिकी नाईक म्हणाले की, सध्या पणजीतील कॅसिनोंमध्ये नियमांचे उल्लंघन करून अंदाधुंदीचा कारभार सुरू आहे. कॅसिनो हे जणू लहान मुलांच्या मनोरंजनाचे ठिकाण आहे, अशा पद्धतीने जाहिरातबाजी केली जात आहे. कॅसिनोंच्या या बेकायदेशीर कृत्यांविरोधात आमचा लढा यापुढेही तीव्र राहणार आहे.

हेही वाचा