यंत्रणा लईराई जत्रेच्या नियोजनात व्यस्त राहिल्याने म्यूटेशन शिबिरांतील कामाचा वेग थंडावला

जत्रेच्या जबाबदारीमुळे अधिकाऱ्यांची मोठी ओढताण

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
49 mins ago
यंत्रणा लईराई जत्रेच्या नियोजनात व्यस्त राहिल्याने म्यूटेशन शिबिरांतील कामाचा वेग थंडावला

पणजी: उत्तर गोवा जिल्ह्यात प्रलंबित असलेले म्यूटेशनचे (नामांतर) अर्ज निकाली काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरांना शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रेच्या नियोजनाचा फटका बसला आहे. जत्रेच्या व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी उपजिल्हाधिकारी आणि मामलेदारांवर असल्याने, दोन दिवसीय शिबिरात अपेक्षेप्रमाणे अर्जांचा निपटारा होऊ शकला नाही. या संदर्भातील अधिकृत माहिती उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दिली आहे.

उत्तर गोवा जिल्ह्यात सध्या म्यूटेशनचे सुमारे २ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. हे अर्ज तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सत्तरी, डिचोली, बार्देश, पेडणे आणि तिसवाडी या मामलेदार कार्यालयांमध्ये गेल्या आठवड्यात विशेष शिबिरांचे आयोजन केले होते. मात्र, २१ एप्रिल रोजी शिरगाव येथील प्रसिद्ध लईराई जत्रेचा मुख्य सोहळा असल्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तिथे व्यस्त होती. उपजिल्हाधिकारी आणि मामलेदारांना जत्रेच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून व्यवस्थापन करावे लागल्यामुळे, त्यांना म्यूटेशन शिबिरांकडे पूर्णपणे लक्ष देता आले नाही.

प्रशासकीय कामाचा हा ताण असूनही, दोन दिवसांच्या कालावधीत उत्तर गोव्यात एकूण २०६ अर्ज निकाली काढण्यात यश आले आहे. यामध्ये बार्देश तालुक्यात सर्वाधिक ११६ अर्जांचा निपटारा करण्यात आला. त्याखालोखाल तिसवाडी तालुक्यात ४७, पेडणे तालुक्यात २३ आणि सत्तरी तालुक्यात २० अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. जत्रेच्या कामाचा व्याप नसता, तर निकालात निघणाऱ्या अर्जांची संख्या अधिक असती, असे मत व्यक्त केले जात आहे. प्रलंबित अर्जांची मोठी संख्या पाहता, आगामी काळात अशा शिबिरांचे प्रभावी नियोजन करून सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनासमोर आहे.

हेही वाचा