
पणजी : वादग्रस्त ३९ (अ) (39(A) विरोधातील आंदोलनादरम्यान नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना पणजी पोलिसांनी समन्स बजावले आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना आज सोमवारी दुपारी ४ वाजता पणजी पोलीस स्थानकात (Panjim Police Station) उपस्थित राहण्यास समन्समधून (Summons) सांगण्यात आले आहे.
गोव्यात (Goa) गेल्या काही दिवसांमागे नगरनियोजन खात्यातील ३९ (अ) कलमाविरोधात मोठे आंदोलन करण्यात आले होते. आमदार वीरेश बोरकर यांनी हे आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर पणजीतील आझाद मैदानावर हे आंदोलन सुरू होते व त्याला वाढता प्रतिसाद मिळाला होता.
त्यानंतर त्यातील काही आंदोलनकर्त्यांनी मंत्री विश्वजीत राणे यांच्या मिरामार येथील निवासस्थानी मोर्चा वळवला होता. त्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. त्यात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव (Yuri Alemao) यांच्यासहीत इतर विरोधी आमदार, नेते सहभागी झाले होते.
याप्रकरणी पोलिसांनी युरी आलेमाव व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. आता याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम ३९ (अ) अंतर्गत त्यांना आज दुपारी ४ वाजता पणजी पोलीस स्थानकात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.