म्हणाले-शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांना करिअरसाठी योग्य दिशा दाखवावी. आजपासून ११वी साठी भरती प्रक्रिया सुरू.

पणजी: अकरावीच्या प्रवेशावेळी केवळ तुकड्या भरण्यासाठी केवळ विद्यार्थ्यांची 'भरती' करण्याकडे लक्ष देऊ नका, तर त्यांना त्यांच्या आवडीनुसार योग्य शैक्षणिक दिशा दाखवण्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शक म्हणून भूमिका वठवावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. गोवा शालांत मंडळाचा (SSC) १०वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, ११वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले.
यंदा १०वीचा निकाल ९४.५१% इतका उत्कृष्ट लागला असून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. विशेषतः ग्रामीण भागातील सांगे, केपे, धारबांदोडा, काणकोण आणि पेडणे यांसारख्या तालुक्यांमधील विद्यार्थ्यांनी शहरी भागाच्या तुलनेत सरस कामगिरी केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, मुलींनी मिळवलेल्या घवघवीत यशाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
करिअर निवडताना विचार करा
अकरावीच्या प्रवेशासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या पारंपरिक शाखांसोबतच प्रोफेशनल कोर्सेस, आयटीआय (ITI) किंवा डिप्लोमा यांसारख्या पर्यायांचाही गांभीर्याने विचार करावा. पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करावी.
शिक्षकांसाठी महत्त्वाची सूचना
मुख्यमंत्र्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना सुचित केले की, केवळ आपली पटसंख्या वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेऊ नका. त्याऐवजी, दहावीच्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याला कोणत्या विषयात रस आहे हे ओळखून त्याला योग्य मार्गदर्शन करावे. शिक्षकांचे प्रयत्न आणि गोवा बोर्डाची तत्परता यामुळे यंदाचा निकाल प्रगतीशील लागला आहे, ही परंपरा पुढेही कायम राहावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.