किनारा तातडीने स्वच्छ करा; केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांची पर्यटन खात्याकडे मागणी.

मडगाव : मोबोर किनारी भागात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचऱ्यासह समुद्रातून तेलकट डांबराचे गोळे (टारबॉल्स) वाहून आले आहेत. यामुळे पर्यटकांनीही या भागात जाणे टाळले आहे. केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी यासंदर्भात पर्यटन खात्याला माहिती देऊन किनारा तातडीने स्वच्छ करण्याची मागणी केली आहे.
मोबोर समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा आणि डांबराचे गोळे साचल्याचे निदर्शनास येताच सरपंच डिक्सन वाझ यांनी परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांसह स्वच्छता राखणाऱ्या एजन्सीला या परिस्थितीची कल्पना देऊन साफसफाईची विनंती केली. पर्यटन खात्यानेही याची तत्काळ दखल घेत कचरा उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सरपंच डिक्सन म्हणाले की, यावर्षी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात डांबराचे गोळे आणि प्लास्टिक कचरा किनाऱ्यावर आल्याचे दिसून येत आहे. बदलत्या हवामानामुळे समुद्राच्या तळाशी असलेला कचरा लाटांसोबत पुन्हा किनाऱ्यावर फेकला जातो. ही परिस्थिती गंभीर असून, पर्यटकांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. अशाप्रकारची स्थिती पर्यटनासाठी मारक ठरू शकते. किनारी भागातील व्यवसाय पर्यटनावरच अवलंबून असल्याने शासनाने याची तत्काळ दखल घेणे गरजेचे आहे.