बेपत्ता २१ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह कपिलेश्वरी तळीत आढळला; फोंड्यात खळबळ

बुधवारी सकाळी कुणालाही कल्पना न देता सेजल घरातून बाहेर पडली होती.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
34 mins ago
बेपत्ता २१ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह कपिलेश्वरी तळीत आढळला; फोंड्यात खळबळ

पणजी : फोंडा शहरात बुधवारी सकाळी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली. कवळे येथील प्रसिद्ध श्री देव कपिलेश्वर मंदिरासमोरील तळीत एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली. सेजल प्रशांत तिळवे (वय २१, रा. ढवळी-फोंडा) असे मृत तरुणीचे नाव असून, ती कायद्याचे शिक्षण घेत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सेजल ही कायदा महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिकत होती. बुधवारी पहाटे ती कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडली. मुलगी घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबाने आणि मित्रांनी तातडीने शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, कपिलेश्वरी मंदिरासमोरील तळीत एका व्यक्तीने उडी घेतल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. याच माहितीच्या आधारे संशय बळावल्याने तिचे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी तळीकडे धाव घेतली.

तळीत कोणीतरी उडी मारल्याची माहिती मिळताच फोंडा अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा दलाला पाचारण करण्यात आले. दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शोधमोहीम सुरू केली. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जवानांना एका तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. हा मृतदेह सेजलचाच असल्याचे स्पष्ट होताच घटनास्थळी तिच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

फोंडा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला आहे. सेजलने हे टोकाचे पाऊल का उचलले, की ही केवळ एक अपघाती घटना आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलीस सध्या तिच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स आणि अलीकडील वागणुकीचा तपास करत आहेत.


बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा