कोल्हापूर : अनेक तरुणींचे लैंगिक शोषण; दुसरा गुन्हा दाखल

तपासासाठी एसआयटी स्थापन; आणखी एकाला अटक : ‘लव्ह जिहाद’चा संशय

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
कोल्हापूर : अनेक तरुणींचे लैंगिक शोषण; दुसरा गुन्हा दाखल

कोल्हापूर : जिल्ह्यातील गाजत असलेल्या अनेक तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत संशयित आरोपींविरोधात दुसरा गुन्हा दाखल केला आहे. या नव्या घडामोडीमुळे तपासाचा व्याप्ती वाढली असून प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

कोल्हापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हातकणंगले परिसरात शाहिद सनदी याच्याविरोधात बलात्कार व लैंगिक शोषणाचे (sexual exploitation) आरोप ठेवत नवीन एफआयआर ( FIR)  नोंदवण्यात आला आहे. यापूर्वीच्या प्रकरणातही सनदी पोलीस कोठडीत असून, या नव्या गुन्ह्यात त्याला लवकरच औपचारिक अटक करण्यात येणार आहे.

या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्यासह महिला पोलीस अधिकारीही या पथकात समाविष्ट असून, प्रकरण संवेदनशीलतेने हाताळले जात आहे.

दुसऱ्या पीडितेच्या तक्रारीनंतर आणखी एक गुन्हा 

मंगळवारी एका २२ वर्षीय तरुणीने कोल्हापूर पोलिसांकडे (Kolhapur police) तक्रार दाखल केली. पोलिसांच्या समुपदेशनानंतर तिने आपले निवेदन दिले, त्यावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, “दुसऱ्या पीडितेच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधीच्या प्रकरणातील कोठडी संपल्यानंतर आरोपीला या प्रकरणात अटक करून सखोल चौकशी केली जाईल.”

मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला  

दरम्यान, संशयित आरोपी शाहिद सनदी आणि शाहरुख हुसेन देसाई यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना ४ मेपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणींशी मैत्री

प्राथमिक तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून १८ ते २२ वयोगटातील तरुणींशी मैत्री करून भावनिक संबंध प्रस्थापित करत होते. त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केल्याचा संशय आहे.

तसेच, शिरोली व कोल्हापूरमधील काही लॉजमध्ये पीडितांना बोलावून अत्याचार केल्याचेही उघड झाले आहे. या पद्धतीने अनेक तरुणींना लक्ष्य करण्यात आले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हा आकडा १५ पेक्षा जास्त आहे. 

मोठे संघटित रॅकेट असण्याची शक्यता

या संपूर्ण प्रकरणामागे मोठे संघटित रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नसून, त्या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.

‘लव्ह जिहाद’चा संशय

दरम्यान; याप्रकरणी काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी ‘लव्ह जिहाद’चा संशय व्यक्त केल्याने, पोलीस त्या अनुषंगानेही तपास करीत आहेत. 

हेही वाचा