बेंगळुरूत मुसळधार पावसाचा तडाखा : ४० मिनिटांत १० मृत्यू, शहर ठप्प

एका बालिकेसहीत १० जणांचा मृत्यू

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
बेंगळुरूत मुसळधार पावसाचा तडाखा : ४० मिनिटांत १० मृत्यू, शहर ठप्प

बेंगळुरू : दिलासा देणारा पाऊस ठरेल, अशी अपेक्षा असताना बुधवारी रात्री अवघ्या ४० मिनिटांत कोसळलेल्या मुसळधार पावसाने बेंगळुरू शहराला (Bengaluru city) अक्षरशः गुडघ्यावर आणले. जोरदार वाऱ्यासह (५० किमी प्रतितास), गारपीट आणि वीजांच्या कडकडाटात झालेल्या पावसामुळे १० जणांचा मृत्यू झाला.  शेकडो रस्ते जलमय झाले आणि शहरातील मोठा भाग अंधारात बुडाला.

हवामान खात्याने पुढील ४८ तासांत ३०-४० किमी वेगाच्या वाऱ्यासह पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

भीषण हानी

शहराच्या मध्यवर्ती भागात ७७ मिमी पावसाची (Rain)  नोंद झाली. जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. फांद्या तुटल्या आणि प्रमुख मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. एमजी रोड, इंदिरानगर, कोरमंगळा, सिल्क बोर्ड, बनशंकरी आणि बीटीएम लेआउट परिसरातील रस्ते २ ते ३ फूट पाण्याखाली गेले.

वीजपुरवठा खंडित, हजारो तक्रारी

पावसादरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले.  हेल्पलाईनला (Helpline) सायं. ४ ते ८.३० दरम्यान सुमारे २५ हजार तक्रारी प्राप्त झाल्या.  त्यापैकी १८ हजार तक्रारींना प्रतिसाद मिळाला नाही. ५० हून अधिक वीजखांब कोसळले, १७ ट्रान्सफॉर्मर निकामी झाले.

एका बालिकेसहीत १० जणांचा मृत्यू

शिवाजीनगर येथील बोरिंग हॉस्पिटलच्या कंपाऊंड भिंतीचा कोसळून रस्त्यावरील विक्रेत्यांवर मलबा पडल्याने ७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ६ वर्षीय मुलगी, केरळमधील पर्यटक आणि एक कपड्यांचा व्यापारी यांचा समावेश आहे.

याशिवाय, पावसात विजेचा धक्का बसून २ जणांचा मृत्यू झाला, तर जोरदार वाऱ्यामुळे उडालेल्या पत्र्याने एका व्यक्तीचा बळी घेतला.

पावसामुळे शहर जलमय बनले

पावसामुळे शहर जलमय बनले. शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. सुलतानपेट आणि कामराज रोड परिसरात वाहने अर्धवट पाण्यात बुडाली. सिल्क बोर्ड आणि जयदेव मेट्रो स्थानक परिसर जलमय झाल्याने वाहतूक एकाच लेनवर आली. उघडी मॅनहोल्स आणि खोदलेले रस्ते नागरिकांसाठी जीवघेणे ठरले.

पुस्तक दुकानालाही फटका

चर्च स्ट्रीटवरील प्रसिद्ध “द बुकवर्म” या पुस्तक दुकानात पाणी शिरून सुमारे ४ ते ५ हजार पुस्तके खराब झाली. दुकानमालक कृष्णा गौडा यांना मोठा आर्थिक फटका बसला असून; सोशल मीडियावर मदतीचा ओघ सुरू आहे.

पावसाची तीव्रता अनपेक्षित : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शिवाजीनगरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. “पावसाची तीव्रता अनपेक्षित होती,” असे ते म्हणाले. पूरप्रवण भागांत विशेष अभियांत्रिकी पथके तैनात करण्याचे आदेश देण्यात आले असून; वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

शहराला जबर फटका

अवघ्या एका तासाच्या पावसाने बेंगळुरूची तयारी पुन्हा एकदा उघडकीस आणली असून, नुकसानीतून सावरण्यासाठी शहराला आता बराच काळ लागणार आहे.

हेही वाचा