अमेरिकेची पुन्हा इराणवर हल्ल्याची तयारी; २४ तासांत इस्रायलला पुरवला ६,५०० टन शस्त्रसाठा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
अमेरिकेची पुन्हा इराणवर हल्ल्याची तयारी; २४ तासांत इस्रायलला पुरवला ६,५०० टन शस्त्रसाठा

वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसत असून, अमेरिकेने इस्रायलला अवघ्या २४ तासांत सुमारे ६,५०० टन लष्करी साहित्य पाठविल्याची माहिती समोर आली आहे. या हालचालीमुळे अमेरिकेकडून इराणवर पुन्हा मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने  (CENTCOM) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना इराणविरोधातील संभाव्य लष्करी कारवाईबाबत ४५ मिनिटांचे सविस्तर सादरीकरण केले. या बैठकीत ‘जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ’चे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

इस्रायलच्या (Israel) संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, दोन मालवाहू जहाजे आणि अनेक विमानांद्वारे अमेरिकेकडून (US ) हवाई व भू-लढाईसाठी आवश्यक दारुगोळा, लष्करी ट्रक्स, जॉइंट लाइट टॅक्टिकल व्हेइकल्स (JLTVs) आणि अन्य उपकरणे इस्रायलमध्ये पोहोचली. इराणविरोधातील संघर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत इस्रायलला १,१५,६०० टनांहून अधिक लष्करी साहित्य मिळाले असून, ४०३ हवाई आणि १० सागरी मोहिमांद्वारे हा पुरवठा करण्यात आला आहे.

तीन लष्करी पर्यायांवर चर्चा

अहवालानुसार, सेंट्रल कमांडने इराणविरोधात तीन संभाव्य पर्याय मांडले आहेत. पहिला पर्याय म्हणजे अल्पकाळात तीव्र हवाई हल्ले करून इराणला (Iran) चर्चेच्या टेबलावर आणणे. दुसरा पर्याय म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनीचा काही भाग ताब्यात घेऊन व्यापारी वाहतूक पुन्हा सुरू करणे, ज्यासाठी भूदलाचीही गरज भासू शकते. तिसरा पर्याय म्हणजे इराणच्या उच्च संवर्धित युरेनियम साठ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष दलाची कारवाई.

दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान ( Masoud Pezeshkian) यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप करताना सांगितले की, चर्चेदरम्यानही अमेरिकेकडून हल्ले होऊ शकतात. त्यामुळे वॉशिंग्टनवरील विश्वास पूर्णपणे ढासळला आहे. त्यांनी संवाद आणि राजनैतिक मार्गाने मतभेद सोडवण्याची भूमीका कायम असल्याचेही स्पष्ट केले.

सध्याच्या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, जागतिक पातळीवर याकडे चिंतेने पाहिले जात आहे.

हेही वाचा