गुन्हे अन्वेषण खात्याचे अधीक्षक राहुल गुप्ता यांची माहिती

पणजी : म्हापसा, दोनापावला दरोडा (Dacoity) प्रकरणात अटक झालेल्या बांगलादेशी (Bangladeshi) टोळीतील सदस्य दरोड्यापूर्वी त्या भागातील रेकी करत होते. त्या भागात लोक कधी झोपतात, कधी उठतात याचा अभ्यास ते करत होते. यामुळे त्यांना त्या भागात लोक कमी सक्रीय कधी असतात याची माहिती मिळत होती. या माहितीनुसार ते दरोडा घालत होते अशी माहिती गुन्हे अन्वेषण खात्याचे (Crime Branch, Goa) अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
शुक्रवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलीस महासंचालक आलोक कुमार व अन्य अधिकारी उपस्थित होते. गुप्ता यांनी सांगितले की, दोन्ही दरोड्या प्रकरणी गोवा पोलिसांनी (Goa Police) आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. दरोड्याबाबत प्राथमिक चौकशी सुरू झाली आहे. यातील एक आरोपी नदीम खान याला याआधी २०२२ मध्ये फोंडा एटीएम (ATM) चोरी प्रकरणात पकडण्यात आले होते. तो कोळवाल तुरुंगात असताना त्याने आपले नेटवर्क तयार केले. टोळीतील अन्य सदस्यांना गोव्याविषयी माहिती देण्याचे काम त्यानेच केले. दोनापावला प्रकरणात नदीमला कळंगुट येथे राहणाऱ्या मेहमूद ( उत्तर प्रदेश) याने मदत केली होती. यानंतर मेहमूद यालाही अटक करण्यात आली होती.
आरोपी सैफुल बेंगळूर येथे काही काळ राहत होता. त्याला मदत करणाऱ्या राजू बी, आणि सफीकुल यांनाही अटक झाली आहे. बांग्लादेशी टोळीचे सदस्य रेकी करताना दोन ते तीन गटात फिरत असत. दिवसभर रेकी करून संध्याकाळी ते एकत्र येऊन एकमेकांना माहिती देत होते. रेकी दरम्यान ते त्या भागातील जंगल, समुद्र किनारे अशा ठिकाणी लपून राहत होते. ज्या घराच्या जवळपास सीसीटीव्ही नसेल असेच घर ते निवडत होते. त्यांनी स्थानिक बाजारातून हातोडी, सुरी अशी हत्यारे मिळवली होती. ही हत्यारे कोणी पुरवली याचा तपास सध्या सुरू आहे.
दर सहा महिन्यांनी बांगलादेशमधून भारतात येऊन दरोडे
ही टोळी दर सहा महिन्यांनी बांग्लादेशमधून भारतात येऊन विविध राज्यांत दरोडे टाकत होती. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोड्यानंतर टोळी मेघालयमार्गे बांगलादेशमध्ये पोहोचली. तसेच परत भारतात येण्यासाठी देखील मेघालय मार्गाचा वापर करण्यात आला. गोवा पोलिसांनी ही दोन्ही प्रकरणे गंभीरपणे घेतली आहेत. दरोडा पडल्यानंतर २४ तासात आम्हाला आरोपींची ओळख पटली होती. मात्र हैदराबाद येथे सीसीटीव्ही फूटेज न मिळाल्याने ते आमच्या हातातून थोडक्यात सुटून गेल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
गोवा पोलिसांचा चांगला समन्वय : पोलीस महासंचालक
पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले की, या दोन्ही प्रकरणात गोवा पोलिसांनी बीएसएफ, बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दिल्ली पोलिसांसोबत चांगला समन्वय ठेवला होता. यामुळे आरोपींना पकडणे शक्य झाले. ही टोळी २०१० पासून देशातील विविध राज्यांत गुन्हे करत आहे.