वाळपई पोलीस स्थानकात तणाव; मयत मोईन शेखच्या कुटुंबियांचे आंदोलन

म्हणाले- उपनिरीक्षकाचे निलंबन करावे तसेच प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
वाळपई पोलीस स्थानकात तणाव; मयत मोईन शेखच्या कुटुंबियांचे आंदोलन

पणजी : वाळपईतील मोईन शेख या तरुणाच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी पोलीस स्थानकाबाहेर जोरदार निदर्शने केली. उपनिरीक्षक प्रथमेश गवस यांच्यावर प्रकरणाचा चुकीचा तपास केल्याचा आणि महिलांशी गैरवर्तन केल्याचा गंभीर ठपका ठेवत, त्यांच्या तात्काळ निलंबनाची आणि प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

सविस्तर माहितीनुसार, मोईन शेख याचे एका तरुणीवर प्रेम होते. मात्र, या प्रेमसंबंधांना तरुणीच्या घरच्यांकडून तीव्र विरोध होता. तरुणीच्या नातेवाईकांनी मोईन शेख विरोधात वाळपई पोलीस स्थानकात जाऊन तक्रारही दाखल केली होती. 

कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनुसार, तरुणीचे इतर एका व्यक्तीशीही संबंध आहेत. त्या व्यक्तीने आणि तरुणीच्या घरच्यांनी मिळून मोईनला बेदम मारहाण केली होती. या घटनेमुळे मोईन प्रचंड मानसिक तणावाखाली आला. यामुळे मोईनने अखेर टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.  

 जेव्हा मोईनचे कुटुंबिय न्याय मागण्यासाठी वाळपई पोलीस स्थानकात गेले, तेव्हा तेथे कार्यरत असलेले उपनिरीक्षक प्रथमेश गवस यांनी योग्य प्रक्रियेचे पालन केले नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मोईनसोबत पोलीस स्थानकात उपस्थित असलेल्या महिलेशीही असभ्य वर्तन केले असाही आरोप उपनिरीक्षक गवस यांच्यावर कुटुंबीयांनी केला आहे. 

या सर्व घटनाक्रमामुळे संतप्त जमावाने पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली आणि दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होत नाही आणि मोईनच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी ठाम भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे. वृत्त लिहीपर्यंत पोलीस स्थानकाच्या बाहेर तणावपूर्ण शांतता होती.


हेही वाचा