कुंकळ्ळी आयडीसीतील ५० हजार टन घातक कचरा हटवण्यास अखेर सुरुवात

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
कुंकळ्ळी आयडीसीतील ५० हजार टन घातक कचरा हटवण्यास अखेर सुरुवात

मडगाव :कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत (IDC) गेल्या अनेक वर्षांपासून पडून असलेल्या घातक कचऱ्याचा प्रश्न अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. स्थानिक नागरिकांचा प्रदीर्घ लढा आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे, सरकारने येथील ५० हजार मेट्रिक टन घातक कचरा हटवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. आमदार युरी आलेमाव, स्थानिक नगरसेवक आणि आंदोलकांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

येथील कचरा शास्त्रोक्त पद्धतीने हटवला जाणार असून, परिसरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. पावसाळा जवळ येत असल्याने प्रशासनाने हे काम दोन टप्प्यांत करण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात पावसाळा सुरू होईपर्यंत जास्तीत जास्त कचरा उचलला जाईल. पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव काम थांबवले जाणार असून, पावसाळा संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल.

कुंकळ्ळीतील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या घातक कचऱ्याविरोधात स्थानिकांनी अनेक आंदोलने केली होती. या कामाच्या सुरुवातीमुळे आंदोलकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हा विजय केवळ आमचा नसून सर्व कुंकळ्ळीकरांच्या एकजुटीचा परिणाम आहे. लोकांचे आरोग्य आणि जीवन वाचवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे, अशा भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केल्या.

जरी ५० हजार टन घातक कचरा हटवण्यास सुरुवात झाली असली, तरी कुंकळ्ळीतील प्रदूषणाचा प्रश्न पूर्णपणे निकालात निघालेला नाही, असेही स्थानिकांनी स्पष्ट केले आहे. कचरा हटवण्याचे काम केवळ सुरुवात असून, परिसरातील दुर्गंधी पसरवणारे फिश मील प्रकल्प आणि इतर प्रदूषणकारी कारखान्यांविरोधात आमचा आवाज यापुढेही बुलंद राहील, असा इशारा स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. या मोहिमेमुळे कुंकळ्ळी परिसरातील हवा आणि पाणी दूषित होण्याचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा