दाबोळीजवळ भीषण हिट-अँड-रन; सुसाट कारच्या धडकेत ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू

आमदार संकल्प आमोणकर यांनी १२ किमी पाठलाग करून संशयिताला पकडले

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
दाबोळीजवळ भीषण हिट-अँड-रन; सुसाट कारच्या धडकेत ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू

पणजी: दाबोळीजवळ काल सायंकाळी घडलेल्या एका हिट-अँड-रन अपघातात ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे वास्को आणि दाबोली परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असतानाच, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी दाखवलेली समयसूचकता आणि धाडस यामुळे या प्रकरणातील संशयिताला तात्काळ जेरबंद करणे शक्य झाले.



आमदार आमोणकर यांनी सुमारे १२ किलोमीटरपर्यंत संशयित वाहनाचा थरारक पाठलाग करून चालकाला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. कोणत्याही लोकप्रतिनिधीने राजकारणाच्या पलीकडे जाऊन दाखवलेले हे कर्तव्य आणि मानवतेचे दर्शन सध्या संपूर्ण गोवाभर एक आदर्श उदाहरण म्हणून चर्चेचा विषय ठरत आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास दाबोळी येथील मुख्य रस्त्यावर हा भीषण अपघात घडला. एक भरधाव वाहन वास्को येथील ५६ वर्षीय महिलेला जोरदार धडक देऊन घटनास्थळावरून वेगाने पळून गेले. या अपघातामध्ये महिलेला अतिशय गंभीर दुखापत झाली.




महिलेचा अपघात होण्यापूर्वी सदर वाहन आमदार संकल्प आमोणकर यांच्या वाहनाला सुसाट वेगाने ओव्हरटेक करून पुढे गेले होते. महिला अपघातग्रस्त होऊन जमिनीवर पडल्याचे पाहताच आमोणकरांनी वेळ न दवडता अपघातास कारणीभूत गाडीचा पाठलाग केला. हा थरारक पाठलाग सुमारे १२ किलोमीटरपर्यंत चालला. या दरम्यान, आमोणकरांनी मुरगाव पोर्ट तसेच वास्को आणि दाबोळी पोलिसांना याबाबत माहिती दिली. गोव्यात नवीन असल्याने संशयित चालकाला रस्त्यांची माहिती नव्हती, त्यामुळे त्याने थेट एमपीटी (MPT) येथे जाणाऱ्या उड्डाणपुलाचा मार्ग धरला. पुढे रस्ता बंद (डेड-एंड) असल्याने त्याला गाडी थांबवावी लागली. आमदार आमोणकर आणि पोलीस तेथे दाखल झाले आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. घटना वास्को परिसरात घडली असल्याने त्याला वास्को पोलीस ठाण्यात आणण्यात आले.




या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक गुरुदास कदम यांनी सखोल माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, आमदारांच्या या समयसूचकतेमुळे संशयित सचिन चोप्रा (उज्जैन, मध्य प्रदेश) याला पळून जाण्याची संधी मिळाली नाही व वेळेत अटक करणे शक्य झाले. पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. मृत महिला सिद्धम् मदार (५६) हिच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलीस अधिक सखोल तपास करत आहेत.




या घटनेमुळे दाबोळी परिसरातील रहिवाशांमध्ये मोठा संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी रस्ते सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. रात्रीच्या वेळी होणाऱ्या भरधाव वाहनांच्या अनिर्बंध वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कडक गस्त वाढवण्याची मागणी केली. तसेच दाबोळी ते वास्को मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक आणि पुरेशा पथदिव्यांची व्यवस्था करण्याची गरज नागरिकांनी बोलून दाखवली.

रात्रीच्या वेळी अशा प्रकारच्या गंभीर अपघातानंतर पाठलाग करून गुन्हेगाराला पकडणे हे मोठे धाडसाचे काम आहे, असे म्हणत पोलिसांनी आमदारांच्या धाडसाचे कौतुक केले. अपघात अनावधानाने घडतात, पण एक बांधिलकी दाखवून संबंधित चालकाने अपघातग्रस्ताची मदत करणे गरजेचे आहे, असेही अधीक्षक कदम म्हणाले.

हेही वाचा