
पुद्दुचेरी : पुद्दुचेरीत विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) पुन्हा सत्तेत येण्याच्या मार्गावर असल्याचे सुरूवातीच्या कलांमधून स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री एन. रंगासामी (N. Rangasamy) हे थट्टांचवडी मतदारसंघातून आघाडीवर असून, सत्ताधारी ऑल इंडिया एन.आर. कॉंग्रेसने (All India N.R. Congress (AINRC)) सत्ता टिकवण्यासाठी जोरदार लढत दिली आहे.
या निवडणुकीत केंद्रशासित प्रदेशात विक्रमी 89.87 टक्के मतदान नोंदवले गेले आहे. १९६४ मध्ये भारतात विलीन झाल्यानंतरचा हा सर्वाधिक मतदानाचा टक्का ठरला आहे. या उत्स्फूर्त सहभागामुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
मतमोजणीची प्रक्रिया सोमवारी सकाळी ८ वाजता सहा केंद्रांवर सुरू झाली. सर्वप्रथम टपाल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली, त्यानंतर सकाळी ८.३० वाजल्यापासून ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यातील 30 विधानसभा मतदारसंघांसाठी 9 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. सत्ताधारी आघाडीला आव्हान देण्यासाठी काँग्रेस आणि द्रमुकसह इतर पक्षांचा समावेश असलेल्या इंडिया ब्लॉकने (INDIA bloc) एकत्र येत मुख्यमंत्री रंगासामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सत्तेबाहेर करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. तथापि, सुरूवातीच्या कलांनुसार एनडीए आघाडी मजबूत स्थितीत दिसत असून, पुद्दुचेरीत पुन्हा सत्ता स्थापनेची शक्यता वर्तवली जात आहे.