
मुंबई/बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत (Baramati assembly bypoll) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत मोठी आघाडी घेतली आहे. हा विजय त्यांनी आपल्या दिवंगत पती अजित पवार (Ajit Pawar) यांना श्रद्धांजली म्हणून अर्पण केला आहे.
मतमोजणीच्या २४ पैकी १५ फेऱ्यांमध्येच सुमारे १.३२ लाख मतांची आघाडी घेत सुनेत्रा पवार विक्रमी विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांच्या विजयाची ही लाट बारामतीच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिणारी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पहिल्या प्रतिक्रियेत सुनेत्रा पवार म्हणाल्या, “अजित दादांनंतरची ही पहिली निवडणूक आहे. मी कधीच निवडणूक लढवेन असे वाटले नव्हते. बारामतीकरांनी दिलेला हा कौल म्हणजे अजित दादांना खरी श्रद्धांजली आहे.” त्यांनी मतदारांचे मनःपूर्वक आभार मानत, विकासकामांच्या माध्यमातून अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
२३ एप्रिल रोजी पार पडलेली ही पोटनिवडणूक अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातातील निधनानंतर घेण्यात आली होती. बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. या पार्श्वभूमीवर, काँग्रेससह कोणत्याही प्रमुख पक्षाने सुनैत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार न उभा करता त्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला.
शरद पवार, सुप्रिया सुळे यांचे आभार : सुनेत्रा पवार
सुनेत्रा पवार यांनी पक्षप्रमुख शरद पवार (Sharad Pawar) आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे विशेष आभार मानले. “बारामती हेच माझे कुटुंब आहे. शरद पवार यांनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला, हे माझ्यासाठी मोठे पाठबळ आहे. सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबाने केलेले काम पुढे नेण्याचा मी प्रयत्न करेन,” असे त्या म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन
याचवेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांचे भाजपचे पश्चिम बंगाल व आसाममधील विजयाबद्दल अभिनंदन करत, “जनतेचा विश्वास या निकालातून पुन्हा अधोरेखित झाला आहे,” असे नमूद केले.
दरम्यान, सुनैत्रा पवार यांच्या विजयाचा फरक हा अजित पवार यांनी २०१९ मध्ये केलेल्या १.६५ लाख मतांच्या विक्रमालाही आव्हान देऊ शकतो. तसेच, १९९० मध्ये शरद पवार यांनी मिळवलेल्या ७५ टक्के मतांच्या विक्रमालाही हा निकाल जवळ जाऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.