भाजयुमोच्या आंदोलनाविरोधात एफआयआर दाखल करा : आपची मागणी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
भाजयुमोच्या आंदोलनाविरोधात एफआयआर दाखल करा :  आपची मागणी

पणजी : आम आदमी पक्षाने (Aam Adami Party, Aap) ५ मार्च रोजी येथील भाजपा मुख्यालयासमोर आंदोलन केले होते. याविरोधात पणजी पोलिसांनी आप कार्यकर्त्यांना समन्स पाठवले आहे. अशाच पद्धतीचे आंदोलन भारतीय जनता युवा मोर्चाने (Bhartiy Janta Yuva Morcha) २१ फेब्रुवारी रोजी काँग्रेस (Congress) मुख्यालयासमोर केले होते. याबाबत पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान मंत्री (IT आयटी) Minister) रोहन खंवटे आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांविरोधात एफआयआर दाखल करावा; अशी मागणी प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी केली.

यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी पणजी पोलीस स्थानकासमोर धरणे आंदोलन केले. नाईक यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दाखल केलेले खोटे प्रकरण न्यायालयात चालले नाही. यानंतर आम्ही पणजी येथील भाजपा मुख्यालयासमोर आंदोलन केले होते. येथे आम्ही पुतळाही जाळला होता. यासाठी पणजी पोलिसांनी आमच्यावर एफआयआर (FIR)  दाखल केला आहे. मुळात आंदोलन करणे हा आमचा लोकशाहीतील अधिकार आहे. आम्ही कोणतेही कायदे मोडले नव्हते. जाळून झालेल्या पुतळ्याचा कचरा देखील आम्ही एका बॉक्समध्ये गोळा करून ठेवला होता. आम्ही शांततापूर्ण आंदोलन केले होते. 

तरीही आमच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  याउलट भाजप युवा मोर्चाने २१ फेब्रुवारी रोजी केलेल्या आंदोलनात अनेक कायद्यांचा भंग करण्यात आला होता. आंदोलकांनी वाहतुकीस अडथळा केला होता, पोलिसांना धक्काबुक्की देखील केली होती. असे असून देखील केवळ सत्ताधारी पक्षाचे असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. लोकशाहीमध्ये सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. यासाठीच भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांविरोधात एफआयआर दाखल झाली पाहिजे अशी मागणी नाईक यांनी केली.

संदेश तेलेकर देसाई म्हणाले की, मागील काही वर्षांत भाजप (BJP) विरोधी पक्ष तसेच गोव्यासाठी लढणाऱ्यांच्या विरोधात सुडाची कारवाई करत आहे. आंदोलन करणाऱ्या विरुद्ध एफआयआर दाखल करून त्यांना समन्स पाठवले जात आहे. भाजपच्या या दबाव तंत्राला आम्ही कदापीही घाबरणार नाही. आज आम्हाला समन्ससाठी बोलवले आहे. जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही पणजी पोलीस स्थानकाच्या दारात बसून धरणे आंदोलन करणार आहोत.

हेही वाचा