पश्चिम बंगालमध्ये उद्या शपथबद्ध होणार पहिले भाजप सरकार

४ हजार पोलीस तैनात; आज होणार विध‌िमंडळ पक्षनेत्याची निवड

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
पश्चिम बंगालमध्ये उद्या शपथबद्ध होणार पहिले भाजप सरकार

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या पहिल्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची (swearing-in ceremony of West Bengal’s first BJP government)  जय्यत तयारी सुरू आहे. उद्या शनिवारी ९ मे रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी कोलकाता सज्ज होत आहे.  कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडला अभेद किल्ल्याचे स्वरूप देण्यात आले आहे. सुरक्षेसाठी ४ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. आज संध्याकाळी भाजपच्या नव्याने निवडून आलेल्या आमदारांची बैठक होणार असून; त्यात विधिमंडळ पक्षनेत्याची निवड केली जाणार आहे.

२९४ सदस्यीय विधानसभेत भाजपने २०७ जागांवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर बंगालच्या राजकारणात मोठा बदल घडला आहे. रविंद्र टागोर जयंतीच्या सांस्कृतिक उत्साहात होणारा हा शपथविधी सोहळा राज्याच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार

उद्या सकाळी १० वाजता होणाऱ्या या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah),  भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच एनडीएचे (NDA) वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. 

आज होणार विध‌िमंडळ पक्षनेत्याची निवड

दरम्यान, आज संध्याकाळी भाजपच्या नव्याने निवडून आलेल्या आमदारांची बैठक होणार असून त्यात विधिमंडळ पक्षनेत्याची निवड केली जाणार आहे.

कडक सुरक्षा

कोलकाता पोलिसांनी ‘झिरो एरर सिक्युरिटी’चा आराखडा तयार केला असून पोलीस आयुक्त अजय नंद (Kolkata Police Commissioner Ajay Nand)  स्वतः संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त, संयुक्त आयुक्त आणि डीसी दर्जाचे अधिकारी विविध सुरक्षा स्तरांचे नेतृत्व करणार आहेत. केंद्रीय सुरक्षा दलही राज्य पोलिसांच्या समन्वयाने कार्यरत राहणार आहे.

ब्रिगेड ग्राऊंडचे ३० विभाग

९०० एकरांहून अधिक क्षेत्रफळ असलेल्या ब्रिगेड ग्राऊंडचे सुमारे ३० विभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक विभागावर उपायुक्त किंवा सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण परिसर ‘नो-फ्लाय झोन’ घोषित करण्यात आला असून; खासगी ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे. परिसरातील उंच इमारतींवर स्नायपर्स आणि निरीक्षक तैनात करण्यात येणार आहेत.

प्रवेशासाठी डोअर-फ्रेम मेटल डिटेक्टर्स

कार्यक्रमस्थळी प्रवेशासाठी डोअर-फ्रेम मेटल डिटेक्टर्स, हँडहेल्ड स्कॅनर्स आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. पोलिसांकडून छतांवरून आणि आसपासच्या परिसरातून विशेष नजर ठेवली जाणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील काही मार्गांवर वाहतूक निर्बंध आणि वळणे लागू करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्रत्येक मतदारसंघातून ३ हजार समर्थक

दरम्यान, राजारहाट गोपालपूर मतदारसंघातील भाजपचे विजयी उमेदवार तरुणज्योती तिवारी (Tarunjyoti Tiwari ) यांनी, “प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून किमान तीन हजार समर्थक कोलकात्याकडे रवाना होत आहेत. बंगालच्या इतिहासातील हा एक अविस्मरणीय क्षण ठरेल,” असे सांगितले.


हेही वाचा