
सहारसा : बिहारमधील सहारसा जिल्ह्यातील बलुआहा गावातील एका माध्यमिक शाळेत मध्यान्ह भोजनातून सापाचे पिल्लू (snake was found in the mid-day meal mid-day meal in a school in the Saharsa district of Bihar) आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर भोजन केलेल्या १५० हून अधिक विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी नेहमीप्रमाणे स्वयंसेवी संस्थेमार्फत पुरविण्यात आलेले मध्यान्ह भोजन विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. विद्यार्थ्यांना डाळ-भात वाढत असताना एका विद्यार्थ्याच्या ताटात सापाचे पिल्लू आढळल्याचा दावा पालकांनी केला. त्यानंतर काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांनी पोटदुखी व उलट्यांची तक्रार करण्यास सुरूवात केली.
शाळेत त्या दिवशी ५४५ विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी सुमारे २०० विद्यार्थ्यांनी साप आढळण्यापूर्वीच भोजन केले होते. भोजनानंतर अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने शाळा प्रशासनाने तत्काळ पोलीस व आरोग्य विभागाला माहिती दिली.
घटनेनंतर पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना स्वतःच्या वाहनातून स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तर नंतर रुग्णवाहिकांद्वारे इतर विद्यार्थ्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ११५ विद्यार्थ्यांवर सदर रुग्णालयात उपचार सुरू असून, सुमारे ५० विद्यार्थ्यांना महिषी सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, मध्यान्ह भोजन पुरवठ्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रशासनाने घटनेची चौकशी सुरू केली आहे.