भाजप-आपमध्ये राजकीय संघर्ष अधिक तीव्र

चंदीगड : पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा (Sanjeev Arora) यांच्या निवासस्थानासह संबंधित ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शनिवारी पुन्हा धाड टाकली. नव्याने नोंदवण्यात आलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. यामुळे पंजाबमधील आम आदमी पक्षाचे (AAP) सरकार आणि केंद्रातील भाजप नेतृत्वातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
ईडीच्या पथकांनी सकाळी सुमारे ७ वाजता चंदीगडमधील सेक्टर-२ येथील अरोरा यांच्या अधिकृत निवासस्थानी धाड टाकली. सुमारे २० वाहनांतून आलेल्या अधिकाऱ्यांसोबत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चंदीगडसह दिल्लीतील दोन ठिकाणांवर आणि गुरुग्राममधील हॅम्पटन स्काय रियल्टी लिमिटेड (Hampton Sky Realty Ltd) कंपनीवरही शोधमोहीम राबवण्यात आली.
ईडीच्या माहितीनुसार, १०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मोबाईल फोनच्या बनावट जीएसटी (GST) खरेदी आणि त्यानंतरच्या निर्यातीद्वारे दुबईमार्गे काळा पैसा भारतात परत आणल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दिल्लीतील अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून बनावट बिलांच्या माध्यमातून फसव्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा (ITC) लाभ घेतल्याचा आरोपही तपास यंत्रणेकडून करण्यात आला आहे.
लुधियाना पश्चिम मतदारसंघाचे आमदार असलेले ६२ वर्षीय अरोरा यांनी तपासात पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली असून “सत्याचा विजय होईल,” असा विश्वास व्यक्त केला आहे. यापूर्वी २०२४ मध्येही राज्यसभा खासदार असताना औद्योगिक जमिनीच्या गैरवापर प्रकरणात ईडीने त्यांच्यावर कारवाई केली होती.
मुख्यमंत्री मान यांचे भाजप सरकारवर आरोप
दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ( Bhagwant Mann) यांनी भाजप सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. “ईडी-भाजपच्या या अनैतिक युतीचा अंत पंजाबमधून सुरू होईल,” असे मान यांनी म्हटले.
केजरीवाल यांचा केंद्र सरकारवर निशाणा
आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनीही केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत, “पश्चिम बंगाल निवडणुका संपताच पंजाबमध्ये दररोज ईडीच्या धाडी सुरू झाल्या,” असे म्हटले. तसेच, “भाजपमध्ये सामील व्हा अन्यथा छाप्यांना सामोरे जा,” असा दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
केजरीवाल यांनी अलीकडेच ईडीच्या कारवाईनंतर भाजपमध्ये प्रवेश केलेले खासदार अशोक कुमार मित्तल (Ashok Kumar Mittal) यांचा उल्लेख करत, “अशोक मित्तल भाजपमध्ये गेले, पण अरोरा गेले नाहीत म्हणून त्यांच्यावर पुन्हा धाड पडली,” असा दावा केला.