भाजप नेत्याच्या मुलाला न्याय मिळत नसेल, तर सामान्यांचे काय? : विजय सरदेसाई

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
भाजप नेत्याच्या मुलाला न्याय मिळत नसेल, तर सामान्यांचे काय? : विजय सरदेसाई

मडगाव: भर बाजारात झालेल्या स्वप्निल वाळके खून प्रकरणातील मुख्य संशयिताला पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे जामीन मिळाला आहे. मृत स्वप्निल हे भाजपचे ज्येष्ठ नेत्या कृष्णी वाळके यांचे पुत्र होते. जर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या कुटुंबालाच न्याय मिळत नसेल, तर राज्यातील सर्वसामान्यांची परिस्थिती काय असेल, याचा विचार केलेला बरा, असा सवाल आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.

मडगावात भर दिवसा झालेल्या या खून प्रकरणाला सहा वर्षे उलटली आहेत. या प्रकरणातील शंभरहून अधिक साक्षीदारांपैकी केवळ सात जणांचे जबाब आतापर्यंत नोंदवण्यात आले. पोलिसांनी वेळेत साक्षीदारांना न्यायालयासमोर हजर न केल्याचा फायदा संशयिताला मिळाला आणि त्याला जामीन मंजूर झाला. यावरून पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे राहत असून, तपास अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे सरदेसाई यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याही आधीपासून कृष्णी वाळके भाजपमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याच सरकारच्या काळात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या मुलाच्या खून प्रकरणात पोलिसांकडून असा ढिसाळ कारभार होत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. गुन्हेगाराला पकडणाऱ्या पोलिसांचा सत्कार व्हायलाच हवा, पण त्या आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे.