
कोलकाता : पश्चिम बंगालचे नूतन मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांचे अत्यंत विश्वासू आणि स्वीय सहायक चंद्रनाथ रथ यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी तीन मुख्य संशियतांना अटक केली आहे. बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून विशाल श्रीवास्तव, राज सिंह आणि मयांक या तिघांना अटक केली. एका टोल नाक्यावर केलेल्या 'यूपीआय' पेमेंटमुळे या हत्येचा छडा लागला आहे.
७ मे रोजी रात्री १० ते १०:१० च्या सुमारास चंद्रनाथ रथ आपल्या गाडीने उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम येथील घरी परतत होते. घरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर असताना एका सिल्व्हर रंगाच्या कारने त्यांचा रस्ता अडवला. त्याच क्षणी दुचाकीवरून आलेल्या हल्खोरांनी कारच्या पुढच्या सीटवर बसलेल्या रथ यांच्यावर अत्यंत जवळून गोळ्या झाडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हल्ल्यानंतर संशियतांनी आपली कार तिथेच सोडून दिली आणि एका लाल रंगाच्या कारसह दुचाकीवरून पळ काढला. पोलिसांनी कोलकाता जवळील बाली येथील टोल प्लाझावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशियतांनी तेथे टोल भरण्यासाठी युपीआयद्वारे पैसे दिल्याचे समोर आले. या डिजिटल व्यवहारामुळे पोलिसांना संशियतांची ओळख पटवणे आणि त्यांचा मार्ग शोधणे सोपे झाले.
तपास पथकाच्या मते, ही हत्या अत्यंत नियोजनबद्ध होती. हल्लेखोरांना रथ कारमध्ये नेमके कुठे बसले आहेत याची अचूक माहिती होती. या कटात किमान ८ जणांचा सहभाग असून स्थानिक व्यक्तींनी त्यांना रसद पुरवल्याचा संशय आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलीस आता या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत.