फेसबुकच्या माध्यमातून मनोज परब यांच्या कार्यपद्धतीवर आणि पोस्टवर टीकेची झोड सुरू; लंडनपासून गोव्यापर्यंत चर्चा.

पणजी: रेव्होल्युशनरी गोवन्स पक्ष (आरजीपी) सध्या अंतर्गत वादाच्या वादळात सापडला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब आणि सांत आंन्द्रेचे आमदार विरेश बोरकर यांच्यात उभी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले असून, हा वाद आता सोशल मीडियावर अधिक तीव्र झाला आहे. मनोज परब यांनी फेसबुकच्या माध्यमातून पक्षातील काही पदाधिकाऱ्यांवर आणि विरेश बोरकर यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांवर जाहीर टीका केली होती. यानंतर हा वाद चव्हाट्यावर आला आहे.
एका बाजूला मनोज परब सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपली नाराजी व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे आमदार विरेश बोरकर यांनी या वादावर पूर्णपणे मौन बाळगले आहे. बोरकर यांनी कोणत्याही प्रकारची राजकीय प्रतिक्रिया देणे टाळले असून, ते सध्या आपल्या मतदारसंघातील लोकांच्या संपर्कात राहून दैनंदिन कामांची माहिती सोशल मीडियावर देत आहेत. मात्र, त्यांच्या शांततेचा अर्थ समर्थकांनी वेगळ्या पद्धतीने घेतला आहे. बोरकर यांचे समर्थक डॅगली फर्नांडिस यांनी 'विरेश बोरकर यांची शांती' या शीर्षकाखाली एक लेख लिहून बोरकरांची बाजू लावून धरली आहे. शांतता म्हणजे दुबळेपणा नसून ती एका मोठ्या संघर्षाची तयारी असू शकते, असे म्हणत त्यांनी परब गटाला प्रत्युत्तर दिले आहे.
या वादाच्या पार्श्वभूमीवर फेसबुकवर काही नवीन खाती उघडण्यात आली असून, त्यावरून मनोज परब यांच्यावर आर्थिक अफरातफरीचे आणि पक्षात फूट पाडण्याचे गंभीर आरोप केले जात आहेत. दुसरीकडे परब यांचे समर्थक या आरोपांचे खंडन करत आहेत. या कलहामुळे आरजीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये दोन गट पडले असून लंडनमध्ये असलेल्या गोमंतकीयांकडूनही यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
सध्या पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले आहे. या अंतर्गत संघर्षामुळे पक्षात लवकरच काही मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरजीपीमधील हे कोफुसांव येणाऱ्या काळात कोणते वळण घेते, याकडे गोव्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.