
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील राणी बाग परिसरात एका महिलेवर स्लीपर बसमध्ये सामूहिक बलात्कार (Woman Gang-Raped Inside Bus In Delhi) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बसचा चालक आणि वाहक यांना पोलिसांनी अटक (Driver And Conductor Arrested ) केली आहे. घटनेमुळे दिल्लीतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पितमपुरा येथील झोपडपट्टी भागात राहणारी असून; ती मंगोलपुरीतील एका कारखान्यात काम करते. सोमवारी रात्री कामावरून घरी परतत असताना; सरस्वती विहार येथील बसथांब्यावर एक स्लीपर बस थांबली. त्यावेळी महिलेने बसच्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीकडे वेळ विचारली. याच वेळी तिला जबरदस्तीने बसमध्ये ओढण्यात आल्याचा आरोप आहे.
यानंतर आरोपींनी बस नांगलोईच्या दिशेने नेली आणि प्रवासादरम्यान महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. घटनेनंतर महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून; तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या गुन्ह्यात वापरण्यात आलेली बस जप्त केली आहे. पुढील तपास सुरू आहे. पीडित महिला विवाहित असून; तिला तीन मुले असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
राजकीय वातावरण तापले
दरम्यान, या घटनेवरून राजकीय वातावरणही तापले आहे. आम आदमी पक्षाने भाजप सरकारवर जोरदार टीका करत दिल्लीतील महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप केला. तसेच ही घटना निर्भया प्रकरणाची आठवण करून देणारी असल्याचे पक्षाने म्हटले आहे.