न्यू-वाडे, वास्को येथे बंद घरातून धुराचे लोट; पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
15 mins ago
न्यू-वाडे, वास्को येथे बंद घरातून धुराचे लोट; पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

वास्को : न्यू-वाडे, वास्को (New Vadem, Vasco) येथील नूरानी मशिदीजवळील एका बंद घरातून अचानक मोठ्या प्रमाणात धूर निघाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी त्या भागातून गस्त घालत जाणाऱ्या बीट पोलिसांना स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती दिली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वास्को पोलिसांनी (Vasco Police) तत्काळ घराचे दार तोडून आत प्रवेश केला आणि बादल्यांमधून पाणी टाकून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वास्को अग्निशमन दलालाही (Vasco Fire Station) माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने आग पूर्णपणे विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कपडे इस्त्री करण्यासाठी वापरण्यात आलेली इस्त्री चुकून सुरूच राहिल्याने आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घरातील मंडळी बाहेर गेल्यानंतर ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले.

घटनेमुळे काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलीस व अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

हेही वाचा