जीएसटी कर चुकवेगिरी​प्रकरणी कॅसिनो कंपनीच्या संचालकाला अटक

१४.४८ कोटींच्या कर चुकवेगिरीचा आरोप : १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Story: प्रसाद शेट काणकोणकर । गोवन वार्ता |
2 hours ago
जीएसटी कर चुकवेगिरी​प्रकरणी कॅसिनो कंपनीच्या संचालकाला अटक

पणजी : कॅसिनो संबंधित सेवांवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भरण्यात कसूर करून ‘शून्य विवरणपत्रे’ दाखल करत शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाच्या गोवा विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी कांदोळी-सायपे येथील हॉटेल हिल्टन गोवा रिझॉर्टमधील फिनिक्स कॅसिनो चालवणाऱ्या टर्टल गेमिंग अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक संदीप राधेश्याम राय (४४, ताळगाव) याला अटक करण्यात आली आहे. पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने संशयित राय याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी न्या. मनीषा पाटकर नार्वेकर यांनी आदेश दिला.टर्टल गेमिंग कंपनीने २०२३ मध्ये फिनिक्स कॅसिनोच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला होता. या कंपनीकडून करचुकवेगिरी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, सीजीएसटी विभागाने २७ मार्च २०२६ रोजी कॅसिनोवर छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. तपासादरम्यान कंपनीने जुलै आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये ‘शून्य विवरणपत्रे’ दाखल केल्याचे समोर आले. आर्थिक अडचण असल्याचे कारण देत ही करचुकवेगिरी केल्याची कबुली कंपनीच्या कॅसिनो प्रमुखांनी दिली आहे.
विभागाच्या तपासानुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीवर एकूण १४ कोटी ४८ लाख ३२ हजार ८१९ रुपयांचे कर दायित्व होते. या मुद्दल रक्कमेवर १.१६ कोटी रुपये व्याज आणि ५.९८ कोटी रुपये दंड मिळून एकूण २१.६२ कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. यापैकी कंपनीने २८ एप्रिल ते १४ मे या काळात ९ कोटी ९९ लाख ६० हजार १६४ रुपये जमा केले आहेत.
ही कारवाई साहाय्यक आयुक्त जोगेश पालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक देवेंद्र जलथानिया यांच्या पथकाने केली. न्यायालयात सीजीएसटी विभागातर्फे विशेष अभियोक्ता सिद्धार्थ सामंत यांनी बाजू मांडली आणि संशयिताला कोठडी देण्याची मागणी केली, जी न्यायालयाने मान्य केली.

कंपनीच्या इतर संचालकांचा जबाब

कंपनीचे इतर संचालक शालट सुगतन आणि अबुआली मलिक श्रॉफ यांचा जबाब नोंदवली असता, कॅसिनोचे सर्व आर्थिक व्यवहार संदीप राधेश्याम राय पाहत असल्याचे स्पष्ट झाले. विभागाने राय याला अनेकदा समन्स बजावले होते, मात्र तो हजर राहिला नव्हता. अखेर १४ मे रोजी तो हजर झाल्यानंतर त्याचा जबाब नोंदवून त्याला अटक करण्यात आली.