‘मिस पुणे’ ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात हुंडाबळीचा आरोप; सखोल चौकशीची कुटुंबीयांची मागणी

फरार पतीची माहिती देणाऱ्याला १० हजारांचे बक्षीस जाहीर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
‘मिस पुणे’ ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात हुंडाबळीचा आरोप; सखोल चौकशीची कुटुंबीयांची मागणी

भोपाळ : मॉडलिंग, सिनेमा आणि कॉर्पोरेट क्षेत्रात आपली ओळख निर्माण केलेल्या नोएडातील ३३ वर्षीय ट्विशा शर्मा (Twisha Sharma)  हिचा भोपाळमधील सासरी संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या ट्विशाचा मृतदेह १२ मे रोजी कातारा हिल्स परिसरातील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणात तिचा पती समार्थ सिंह आणि सासू, निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंह यांच्याविरोधात हुंडाबळी व छळाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फरार पतीची माहिती देणाऱ्याला १० हजारांचे बक्षीस जाहीर

ट्विशाच्या कुटुंबीयांनी तिच्यावर विवाहानंतर सातत्याने मानसिक आणि शारीरिक अत्याचार होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच हुंड्याच्या मागण्या, गर्भधारणेबाबत दबाव आणि अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी सहा सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून,  फरार पती समार्थ सिंहची माहिती देणाऱ्याला १० हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. 

‘मला खूप घुस्मट होत आहे’; ट्व‌िशाचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स

दरम्यान, ट्विशाचे तिच्या आईसोबतचे कथित व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स समोर आले असून; त्यामध्ये तिने “मला खूप घुस्मट होत आहे” तसेच “माझे आयुष्य नरक झाले आहे” अशा भावना व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. मृत्यूपूर्वी मैत्रिणीशी झालेल्या इन्स्टाग्राम संभाषणातही तिने “मी मी अडकल्यासारखी झाली आहे” असे म्हटल्याची माहिती समोर आली आहे.

‍कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय

कुटुंबीयांनी ट्विशाच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त करत दुसऱ्या शवविच्छेदनाची मागणी केली आहे. तिच्या शरीरावर जखमांचे निशाण असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यासाठी त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनही केले.

ट्विशा मानसिकदृष्ट्या अस्थिर; सासुचा आरोप

दुसरीकडे, सासू गिरीबाला सिंह यांनी सर्व आरोप फेटाळून लावत ट्विशाला मानसिक अस्थिरता आणि अमली पदार्थांच्या व्यसनाची समस्या असल्याचा दावा केला आहे. न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जात त्यांनी ट्विशाने आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. मात्र ट्विशाच्या कुटुंबीयांनी हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे.

निवृत्त न्यायाधीश कुटुंबाचा दबाव; ट्विशाच्या वडिलांचा दावा 

या प्रकरणात निवृत्त न्यायाधीश कुटुंबाचा प्रभाव वापरून तपासावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही ट्विशाच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण कायदेशीर आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील बनले असून; संपूर्ण देशाचे लक्ष आता भोपाळ पोलिसांच्या (Bhopal Police) तपासाकडे लागले आहे.

हेही वाचा