तीन स्वतंत्र गुन्हे दाखल : तिसवाडी, फोंडा, सासष्टीतील तिघांना गंडा

पणजी : वॉट्सअॅप ग्रुप आणि बनावट ट्रेडिंग अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून राज्यातील तिघांची तब्बल ६.५१ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तिसवाडी, फोंडा आणि सासष्टी तालुक्यातील नागरिकांना गंडा घालण्यात आला असून, याप्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
सासष्टी तालुक्यातील ४६ वर्षीय नागरिकाला फेब्रुवारी २०२६ मध्ये अज्ञात व्यक्तीने ‘एंजल वन मार्केट माँन्स्टर्स’ या वॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले. या ग्रुपमधील पाच जणांनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून ‘एंजल वन’ या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे प्रतिनिधी असल्याचे भासवून त्याला ‘ट्रेंडलॅटीक’ हे अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. शेअर बाजारात प्रचंड नफा मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी या व्यक्तीला तब्बल २ कोटी ९ लाख ७८ हजार ६१२ रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
मात्र, रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता, विविध कारणे सांगून अतिरिक्त शुल्काची मागणी करण्यात आली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येऊन संबंधित व्यक्तीने सायबर विभागात तक्रार दाखल केली.
तिन्ही तक्रारींची गंभीर दखल घेत सायबर विभागाने अज्ञात व्हॉट्सअॅप मोबाईल धारकांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे, असे सायबर विभागाने स्पष्ट केले.
दुसऱ्या घटनेत तिसवाडी तालुक्यातील ५५ वर्षीय महिलेला जानेवारी महिन्यात चार अज्ञात व्यक्तींनी ‘न्यू हेल्थ होरिझन’ नावाच्या वॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी केले. स्वतःला ‘सिटाडेल सिक्युरिटी’चे प्रतिनिधी सांगून संशयितांनी तिला एका अॅपवर ४ कोटी २३ लाख ९४ हजार १६३ रुपयांची गुंतवणूक करण्यास लावले. गुंतवलेली रक्कम परत काढता न आल्याने तिने संपर्क साधला असता, तिलाही अतिरिक्त शुल्क भरण्यास सांगण्यात आले. चौकशीअंती आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिने सायबर विभागात तक्रार दाखल केली.