मारहाणीमुळे मृत्यू : मोबाईल, सोनसाखळी घेऊन संशयित पसार

साखळी : साखळी मतदारसंघातील चिकणे कुडणे गावात मंगळवारी दुपारी एका ५५ वर्षीय महिलेची घरात घुसून बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली. महिलेच्याच घरात सतत ये-जा करणाऱ्या एका ओळखीच्या युवकाने हे कृत्य केले असून, तो महिलेचा मोबाईल आणि गळ्यातील सोनसाखळी घेऊन पसार झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच डिचोली पोलीस स्थानकाच्या पोलीस उपअधीक्षक श्रीदेवी बि. व्ही., पोलीस निरीक्षक विजय राणे आणि इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा प्राथमिक अंदाज घेऊन पोलिसांनी या प्रकरणाची खून म्हणून नोंद केली आहे. या घटनेनंतर पळून गेलेला संशयित सागर रावळ (रा. सावंतवाडी, महाराष्ट्र) याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृत शैला संजय घाडी (वय ५५) या आपल्या तीन मुलांसह (दोन मोठ्या मुली आणि एक लहान मुलगा) चिकणे कुडणे येथे राहत होत्या. या महिलेला मारहाण केलेला सागर रावळ याचे या घरातील लोकांशी चांगले संबंध होते आणि त्याचे त्यांच्या घरात नियमित येणे-जाणे होते.
मात्र, या युवकाचे घरातील मंडळींसोबत वारंवार वाद व भांडणेही होत असत. अशाच एका वादातून सागर रावळ याने पूर्वी घराची खिडकी आणि आतील सामानाची नासधूस केली होती. त्यामुळे त्याच्याविरोधात डिचोली पोलीस स्थानकात तक्रारही नोंद करण्यात आली होती.
अशी पार्श्वभूमी असतानाच मंगळवार, १९ मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सागर रावळ हा शैला घाडी यांच्या घरी आला. त्यावेळी घरात इतर कोणीही नव्हते. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद आणि भांडण झाले. याच भांडणादरम्यान सागर रावळ याने शैला घाडी यांना बेदम मारहाण केली आणि त्यांचे डोके भिंतीवर जोरदारपणे आपटले. या जीवघेण्या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या कृत्यानंतर सागर रावळ याने मृत महिलेचा मोबाईल घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर त्याने त्याच मोबाईलवरून शैला यांच्या मुलींना फोन करून आपण केलेल्या कृत्याची माहिती दिली. या फोनमुळे घरातील मंडळींना या भयंकर प्रकाराची माहिती मिळाली.